राज्यात एक कोटी टन साखर शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 02:33 AM2019-04-14T02:33:40+5:302019-04-14T02:33:42+5:30
उत्तर भारतातील घटलेली मागणी, सलग दुसऱ्या वर्षी देशात साखरेचे भरघोस उत्पादन झाल्यामुळे बाजारात मालाला फारसा उठाव नसल्याने राज्यात सुमारे एक कोटी टन साखर पडून आहे.
पुणे : उत्तर भारतातील घटलेली मागणी, सलग दुसऱ्या वर्षी देशात साखरेचे भरघोस उत्पादन झाल्यामुळे बाजारात मालाला फारसा उठाव नसल्याने राज्यात सुमारे एक कोटी टन साखर पडून आहे. त्यामुळे यंदा देखील राज्यात ५० लाख टन साखर शिल्लक राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात आतापर्यंत १९५ साखर कारखान्यातून ९४७.८७ लाख टन ऊस गाळप झाले असून १०६ लाख ५० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. अद्यापही १६ कारखाने सुरूच आहेत. गेल्या वर्षीच्या (२०१७-१८) हंगामातही राज्यात १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तर, देशात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. विक्रमी साखर उत्पादनामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वी आॅक्टोबर २०१८मध्ये ५३.३६ लाख टन साखर शिल्लक होती.