राज्यातील ४२ लाख सातबारे झाले डिजिटल स्वाक्षरीयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 05:09 PM2018-07-31T17:09:44+5:302018-07-31T17:21:06+5:30
शेतकऱ्यांना सात-बारा उतारा मिळणे सोयीचे जावे या साठी सरकारने १ मे पासून डिजिटल सातबारा उतारा देण्याची घोषणा केली होती. मात्र, जून आणि जुलै महिन्यात तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील सर्व्हर ठप्प पडले होते.
पुणे : शेतकऱ्यांना सात-बारा उतारा मिळणे सोयीचे व्हावे या साठी सुरु केलेल्या डिजिटल मोहीमेअंतर्गत राज्यातील अडीच कोटी सातबारा उताऱ्यांपैकी तब्बल ४२ लाख सात-बारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त झाले आहेत. डिजिटल सातबाराचे बंद पडलेले सर्व्हर पुन्हा सुरु झाले असून, गेल्या दहा दिवसांत पावणेतीन लाख सात-बारा उताºयांवर डिजिटल स्वाक्षरी झाली आहे.
शेतकऱ्यांना सात-बारा उतारा मिळणे सोयीचे जावे या साठी सरकारने १ मे पासून डिजिटल सातबारा उतारा देण्याची घोषणा केली होती. मात्र, जून आणि जुलै महिन्यात तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील सर्व्हर ठप्प पडले होते. त्यामुळे जवळपास पावणेदोन महिने राज्यातील विविध भागातील सात-बारा उताऱ्याची कामे ठप्प पडली होती. राज्यातील औरंगाबाद, नांदेड, नंदुरबार, लातूर आणि परभणी येथील सर्व्हर १९ जुलै रोजी सुरु झाले. या जिल्ह्यात सर्वात शेवटी सर्व्हरचे काम सुरु झाले. त्यानंतर वेगाने सात-बारा उताऱ्याचे काम सुरु करण्यात आले. राज्यात १८ जुलै पर्यंत १ लाख ४१ हजार डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा वितरीत करण्यात आले होते. त्यानंतर ३० जुलै अखेरीस ती संख्या ४ लाख १३ हजार १७२ झाली. म्हणजेच २ लाख ७२ हजार १७२ डिजिटल सातबारा उतारा त्या नंतरच्या अवघ्या दहा दिवसांतच वितरीत झाले.
सध्या राज्यातील १९ जिल्हे मुंबईतील स्टेट डाटा सेंटरशी जोडलेले असून, ८ जिल्हे बीएसएनएल क्लाऊड, ६ जिल्हे पुण्यातील एनआयसी आणि २ जिल्हे स्थानिक सर्व्हरशी जोडण्यात आले आहेत. प्रत्येक विभाग निहाय सर्व्हर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे काम झाल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीचे काम सुरु होईल.
राज्यातील १० लाख नागरिकांनी या डिजिटल सेवेचा फायदा घेतला आहे. राज्यातील अडीच कोटी सात-बारा उतारा आॅनलाईन उपलब्ध आहे. सध्या डिजिटल स्वाक्षरी देण्याचे काम थांबविलेले आहे. आॅनलाईन सात-बारा उताऱ्याची प्रत काढून, त्यावर तलाठ्याची स्वाक्षरी घ्यावी लागत आहे. असा उतारा ग्राह्य धरण्यात येत असल्याची माहिती ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.
------------------
जिल्ह्यातील दीड लाख सातबारा उताऱ्यांवर डिजिटल स्वाक्षरी
जिल्ह्यात १५ लाख सातबारा उतारे असून, त्यातील मावळ, मुळशी, दौंड, बारामती, इंदापूर आणि भोर तालुक्यातील दीड लाख सातबारा उताºयांवर डिजिटल स्वाक्षरी झालेले आहे. हवेली तालुक्यात सव्वा दोन लाख सातबारा उतारा आहेत. या तालुक्यातील १६० गावांपैकी १२० गावांचे काम सुरु आहे.