राज्यात अवघे ६७ हजार टन साखर उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 06:00 AM2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:00:10+5:30

पुराचा फटका : लांबलेल्या पावसामुळे गत हंगामापेक्षा साखर उत्पादनात घट

The state produces about 67,000 tonnes of sugar | राज्यात अवघे ६७ हजार टन साखर उत्पादन

राज्यात अवघे ६७ हजार टन साखर उत्पादन

Next
ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत ऊस पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका राज्यातील साखरेचे उत्पादन १०७.२० लाख टनावरुन ६२ लाख टनापर्यंत घटण्याचा अंदाज

पुणे : गेल्यावर्षी पावसाने दिलेली ओढ आणि यंदा पुराने दिलेला फटका अशा संकटात राज्यातील ऊस गाळप हंगाम अडकला आहे. राज्यात नोव्हेंबर अखेरीस अवघे ६७ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी याच काळात राज्यात तब्बल १८.८९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात कमी उत्पादन झाल्याने यंदा देशातील साखर उत्पादनच १८.८५ लाख टनापर्यंत खाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत देशातील उत्पादनाचा आकडा निम्म्याने कमी असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) जाहीर केली आहे. 
 गेल्या वर्षीच्या (२०१८-१९) गाळप हंगामामधे ५५.०२ लाख हेक्टर ऊस क्षेत्र होते. आॅक्टोबर महिन्यात उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे ऊस क्षेत्रात ४८.३१ लाख हेक्टरपर्यंत घट झाल्याचे दिसून आले आहे. मॉन्सूनमधे आलेला पूर, अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत ऊस पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. तर, मराठवाडा आणि सोलापूरात गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्याने येथील ३० टक्के क्षेत्र घटले आहे. राज्यातील ऊस क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत ११.५४ लाख हेक्टरवरुन ७.७६ लाख हेक्टरपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे यंदा राज्यातील साखरेचे उत्पादन १०७.२० लाख टनावरुन ६२ लाख टनापर्यंत घटण्याचा अंदाज आहे...
लांबलेल्या पावसामुळे राज्यातील ऊस गाळप हंगाम दीड महिना उशीरा सुरु झाला. नोव्हेंबर अखेरीस ४३ साखर कारखाने सुरु झाले असून, ६७ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. नोव्हेंबर-२०१८ रोजी १७५ कारखान्यांनी १८.८९ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. गेल्या हंगामात या काळात देशातील ४१८ साखर कारखाने सुरु झाले होते. त्यातून तब्बल ४०.६९ लाख टन साखर उत्पादित करण्यात आली. यंदा देशातील साखर उत्पादनच १८.८५ लाख टन झाले आहे. 
उत्तरप्रदेशातील १११ साखर कारखान्यांनी १०.८१ लाख टन साखरेचे उत्पादन केले असून, गेल्या हंगामात ते ९.१४ लाख टन होते. कर्नाटकामधील ६१ कारखान्यांनी ५.२१ लाख टन साखर उत्पादित केली आहे. गेल्यावर्षी ६३ कारखान्यांनी ८.४० लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. गुजरातमधील गाळप हंगामही लांबलेल्या पावसामुळे २० दिवस उशीरा सुरु झाला. येथील १४ कारखान्यांनी ७५ हजार टन साखर उत्पादित केली आहे. गेल्यावर्षी १६ कारखान्यांनी २.०५ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते.
 -----------
१५ लाख टन साखर निर्यातीचे करार

देशातील साखर कारखान्यांनी तब्बल १५ लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत. त्यात इराण, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि अफ्रिकन देशांचा समावेश असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिली. 
---------------------------

Web Title: The state produces about 67,000 tonnes of sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.