राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:15 AM2021-09-08T04:15:02+5:302021-09-08T04:15:02+5:30
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्य पूर्व परीक्षा २०२० च्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ...
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्य पूर्व परीक्षा २०२० च्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ही परीक्षा कोरोनामुळे तब्बल सहा वेळा पुढे ढकलण्यात आली होती.
मराठा आरक्षण तसेच नंतर कोरोनामुळे अचानक ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ११ मार्च २०२१ रोजी पुण्यात रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले होते. याची दखल मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली होती. त्यानंतर एमपीएसीने २१ मार्चला परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. २०० पदांसाठी मुख्य परीक्षेसाठी ३ हजार २१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आता मुख्य परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.
या परीक्षेचा खुल्या, विशेष मागासवर्गाचा (एसबीसी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी ) प्रवर्गाचा कट ऑफ साधारण एकूण ४०० गुणांपैकी २०३.५०, महिला १९० गुणांचा असून आहे. अनुसूचित जाती (एससी) १९४.२५ तर अनुसूचित जमाती ( एसटी) प्रवर्गाचा कट ऑफ १७३.५, एनटी (बी) २०२.१२५, एनटी ( सी आणि डी) २०३.५ गुणांचा आहे.
पुण्यातील केंद्रांवर सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण
स्पर्धा परीक्षेचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे केंद्रावरील १०७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नाशिक २२०, नागपूर १०७, औरंगाबाद २४१, मुंबई (मध्य) ११०, मुंबई (पश्चिम) ६६, नवी मुंबई ८३ या प्रमुख केंद्रावरील विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.