राज्यसेवा पूर्व परीक्षा पुण्यात सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:10 AM2021-03-22T04:10:54+5:302021-03-22T04:10:54+5:30
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०’ रविवारी जिल्ह्यातील ७७ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने ...
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०’ रविवारी जिल्ह्यातील ७७ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने व जिल्हा प्रशासनाने आरोग्यविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करून परीक्षा घेतली. काही परीक्षा केंद्रांवर संशयित उमेदवारांची स्वतंत्र बैठक व्यवस्था केली होती. सुमारे वर्षभरापासून लांबलेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा अखेर सुरळीतपणे पार पडली.
जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर सुमारे ३१ हजार उमेदवारांची बैठक व्यवस्था केली होती. तसेच आयोगाने प्रत्येक केंद्रावर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त केली होती. या एजन्सीकडून परीक्षेसाठी येणाऱ्या प्रत्येक उमेदवारांच्या शरीराचे तापमान तपासण्याबरोबरच परीक्षा केंद्राचे सॅनिटायझेशन केले. परीक्षेपूर्वी सुमारे दीड तास आधी उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला. सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ या कालावधीत उमेदवारांनी परीक्षा दिली. पहिल्या सत्रातील पेपर सोपा होता. मात्र, दुपारच्या सत्रातील पेपरमधील उतारे पाहून पेपर सोडविण्यात खूप वेळ गेल्याचे काही उमेदवारांनी सांगितले.
आयोगाने नियोजित तारखेला परीक्षा घ्यावी, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेक उमेदवारांनी पुण्यात आंदोलन केले होते. अखेर परीक्षा झाल्याने उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पहिला पेपर झाल्यानंतर अनेक उमेदवार परीक्षा केंद्राच्या आवारात घोळका करून बसल्याचे दिसून आले. मात्र,बहुतेक उमेदवारांच्या तोंडावर मास्क होता. तर काही उमेदवारांकडून कोरोनाविषयक नियमावलीचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले.
--
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा घेण्यास बराच कालावधी घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने आरोग्यविषयक खबरदारी घेऊन रविवारी परीक्षांचे आयोजन केले. भविष्यातही परीक्षांना उशीर होणार नाही याची काळजी आयोगाने घ्यावी.
- अनिकेत मोरे, उमेदवार
---
कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने परीक्षा काही दिवस पुढे ढकलली. मात्र, जानेवारी महिन्यात रुग्णसंख्या खूप कमी होती. त्याच कालावधीत परीक्षा घ्यायला हवी होती. यापुढे कोरोनाबाबत खबरदारी घेऊन नियोजित तारखेलाच परीक्षा घ्यावी.
- जमीर शेख, उमेदवार
--
सर्व उमेदवार परीक्षेपूर्वी मन लावून अभ्यास करतात. परीक्षा पुढे ढकलल्याने त्यांचे नुकसान होते. त्यामुळे कोणत्याही कारणांमुळे परीक्षांच्या तारखात बदल करण्याची वेळ येणार नाही, याची खबरदारी आयोगाने घ्यावी.
सूरज सूर्यवंशी, उमेदवार