राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेची सुधारित तारीख जाहीर; एसईबीसी आरक्षणासह पदसंख्येत वाढ
By प्रशांत बिडवे | Published: May 8, 2024 08:10 PM2024-05-08T20:10:05+5:302024-05-08T20:10:21+5:30
विविध संवर्गातील एकूण ५२४ पदांसाठी सुधारित तपशील आयाेगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
पुणे : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ सुधारित तारीख जाहीर केली असून दि. ६ जुलै राेजी परीक्षा हाेणार आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अराखीव खुला गटातून अर्ज केलेल्या तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल उमेदवारांना विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करता येणार आहेत. युपीएससीप्रमाणे एमपीएससीनेही नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करावी यासाठी उमेदवारांनी केलेल्या मागणी संदर्भात लाेकमत ने बातमी प्रसिद्ध केली हाेती.
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करीता दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी २७४ रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आणि दि. २८ एप्रिल २०२४ रोजी परीक्षेचे आयाेजन केले हाेते. दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी दि. २६ फेब्रुवारी राेजी राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरीता आरक्षणाची तरतूद करण्यात आली. आयाेगाने आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत राज्य शासनास कळविले तसेच दि. २१ मार्च राेजी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली हाेती.
रिक्त पदांच्या संख्येत वाढ
राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या सुधारित मागणीपत्रानुसार रिक्त पदांत वाढ केली आहे. विविध संवर्गातील एकूण ५२४ पदांसाठी सुधारित तपशील आयाेगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.
येत्या २४ मे पर्यंत अर्ज करता येणार
अर्जाव्दारे अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग एसईबीसी आरक्षणातून लाभ घेण्यासाठी दि.९ ते २४ मे या कालावधीत विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करता येणार आहे.