राज्याची टीबी वॉर रूम पुण्यात कार्यरत; महाराष्ट्र पहिलेच राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 02:36 PM2022-07-30T14:36:24+5:302022-07-30T14:36:54+5:30

असा कक्ष स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य..

State TB War Room functioning in Pune; Maharashtra is the first state | राज्याची टीबी वॉर रूम पुण्यात कार्यरत; महाराष्ट्र पहिलेच राज्य

राज्याची टीबी वॉर रूम पुण्यात कार्यरत; महाराष्ट्र पहिलेच राज्य

Next

पुणे : क्षयरोग निर्मूलनासाठी निगडित असलेला सर्व डेटा तयार करण्यात आला आहे. या रोग निवारणाच्या उपक्रमांतर्गत येणाऱ्या अडीअडचणी लक्षात घेतल्या असून, तसे नियोजनही केले आहे. या राज्यस्तरीय क्षयरोग नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी कक्ष तयार केला आहे, असा कक्ष स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

आरोग्यसेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरोग्यसेवा संचालक डॉ. नितीन आंबाडेकर, सहसंचालक डॉ. रामजी अडकेकर, सीएचआय फाउंडेशनच्या अनन्या व बीएमजीएफ फाउंडेशनचे डॉ. संदीप भारस्वाडकर, डॉ. समीर कुमटा उपस्थित होते. यावेळी नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण, पाठपुराव्याद्वारे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे गावपातळीपर्यंत विकेंद्रीकरण करून या कार्यक्रमात लोकसहभाग घेण्याचे आवाहन रामास्वामी यांनी केले. क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट २०२५ पर्यंत साध्य होण्यासाठी शासकीय, खासगी आणि स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले. बिल ॲण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन व क्लिंटन हेल्थ एक्सेस इनिशिएटिव्ह यांच्या सहकार्याने हा कक्ष उभारण्यात आला आहे.

...असा होईल फायदा

या कक्षात खासगी, शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या कार्यांचा आढावा घेऊन त्यानुसार कार्यप्रणाली अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे जिल्हा व तालुक्यांशी थेट संवाद होऊन दैनंदिन कामकाजात गतिमानता येणार आहे. तसेच गुणवत्ता सुधार कृती करण्याकडे कल निर्माण होण्यास मदत होईल. राज्यात उपलब्ध असणाऱ्या भौतिक सुविधांचा प्रभावी वापर करून कार्यक्रमाची अंमलबजावणी केल्यास या कक्षाद्वारे संबंधित आकडेवारी उपलब्ध होणार आहे. नियमित विश्लेषण तसेच पाठपुरावा करून, प्रभावीपणे कार्य होण्यासाठी याची मदत होईल. कार्यक्रमाशी संबंधित सर्व माहिती, सूचना, निदानात्मक सुविधा, उपचारात्मक सुविधा, डीबीटी योजना यांच्याविषयी रोजच्या रोज माहिती मिळून यात येणाऱ्या अडीअडचणींविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. निक्षय अहवाल व व्यवस्थापन अहवाल मिळवणेही यामुळे अधिक सोपे होणार आहे.

Web Title: State TB War Room functioning in Pune; Maharashtra is the first state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.