एसटी आगारात अन् खासगी बस सुसाट! प्रवाशांकडून आकारले जाताहेत अव्वाच्या सव्वा दर
By अजित घस्ते | Published: November 2, 2023 06:30 PM2023-11-02T18:30:29+5:302023-11-02T18:39:09+5:30
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यादेखील रद्द केल्याने एसटी बस आगारात थांबून आहे, तर खासगी बससेवा वेगात धावत आहे....
पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत एसटीची प्रवासी सेवा बंद आहे. याचा फायदा खासगी वाहनचालकांना होत आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यादेखील रद्द केल्याने एसटी बस आगारात थांबून आहे, तर खासगी बससेवा वेगात धावत आहे.
विदर्भातील सर्व मार्गांवरील खासगी वाहने सुसाट धावत आहेत. सोलापूर, तुळजापूरकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. आता कोकणातील गाड्याही रद्द केल्या आहेत. त्यामुळे सध्या खासगी चारचाकी गाड्या, ट्रॅव्हल सेवा देणाऱ्यांची चलती आहे. त्याचा फायदा खासगी वाहनचालकांना होत आहे.
एकीकडे एसटी बस आगारात उभ्या आहेत, तर दुसरीकडे खासगी गाड्या सर्व मार्गांवर सुरू आहेत. त्यामुळे प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजून प्रवास करण्याची वेळ आली आहे. एरवी कमी तिकीट असणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट या काळात काही पटींनी वाढले आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
नोकरी व कामानिमित्त पुण्यात वास्तव्य करणाऱ्यांमध्ये राज्य आणि राज्याबाहेरील नागरिकांची संख्या मोठी आहे. सुट्यांमुळे ही मंडळी गावी जाण्याच्या तयारीत आहेत; पण राज्यात सुरू असलेल्या आंदोलनामुळे काही मार्गांवरील एसटीची प्रवासी सेवा बंद असल्याने प्रवाशांना नाइलाजाने खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. या संधीचा फायदा घेऊन खासगी वाहतूकदार प्रवाशांना लुटत आहेत. सध्या पुण्यातून दररोज जवळपास ५०० ट्रॅव्हल्स जातात; परंतु या लुटीला कोण आळा घालणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आगारात शुकशुकाट :
- पुण्यातील शिवाजीनगरमधून फक्त नाशिक मार्गावर बससेवा सुरू आहे, तर इतर मार्गांवरील सेवा बंद आहे. त्यामुळे एरवी गर्दी असणाऱ्या या स्थानकात तुरळक प्रवासी दिसत आहेत.
- स्वारगेट आगारातून सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर व कर्नाटक राज्यात जाणारी एसटी बससेवा बंद केली आहे. आता गुरुवारपासून कोकणकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
- स्वारगेट आगारातून फक्त मुंबई बस सुरू आहेत. त्यात आंदोलनाचा धसका घेऊन गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे बस स्थानकात मात्र शुकशुकाट आहे.
- या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी पुण्यातून अनेक मार्गांवरील बससेवा बंद ठेवल्या असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून, खासगी गाड्या सुसाट आहेत.