जानकरांचे ‘ते’ वक्तव्य असभ्यपणाचा कळस
By Admin | Published: October 13, 2016 02:16 AM2016-10-13T02:16:40+5:302016-10-13T02:16:40+5:30
विजयादशमीच्या पवित्र सणाच्या दिवशी शुभेच्छा देण्याऐवजी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत ओकलेली गरळ हे असभ्यपणाचे लक्षण
शिरूर : विजयादशमीच्या पवित्र सणाच्या दिवशी शुभेच्छा देण्याऐवजी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत ओकलेली गरळ हे असभ्यपणाचे लक्षण असल्याची टीका माजी आमदार अॅड. अशोक पवार यांनी येथे केली. दुसऱ्यांवर गरळ ओकण्यापेक्षा महाजन यांनी धनगर आरक्षणाबाबत काय झाले, याचे उत्तर द्यावे, असेही पवार म्हणाले.
विजयादशमीनिमित्त भगवानगडाच्या पायथ्याला पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित मेळाव्यात जानकर यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर शिवराळ भोषत टीका केली होती. त्याच्या निषेधार्थ आज शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावर शिवसेवा मंडळासमोर जानकर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. निषेध सभा घेण्यात आली, त्या वेळी अॅड. पवार बोलत होते. मंत्रिपद मिळत नव्हते तोपर्यंत पवारांची स्तुती व मुख्यमंत्र्यावर टीका करणारे जानकर मंत्रिपद मिळाल्यावर पवारांवर टीका करून दुतोंडी राजकारण करीत असल्याची टीका अॅड. पवार यांनी केली. जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, शिरूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवी काळे यांनीही जानकर यांच्यावर जोरदार टीका केली.
जि.प. सदस्या मनीषा कोरेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जाकीरखान पठाण, माजी अध्यक्ष संतोष भंडारी, युवकचे तालुकाध्यक्ष कुंडलिक शितोळे, घोडगंगाचे संचालक अॅड. रंगनाथ थोरात, बाबासाहेब फराटे, दिलीप मोकाशी, युवकचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, नगरसेवक आबिद शेख, शिक्षण मंडळ सदस्य नीलेश खाबिया, संतोष शितोळे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दिनकर पाडळे, युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे, माजी अध्यक्ष नीलेश पवार, सागर पांढरकामे, हाफीज बागवान, मोनीब शेख, युवती तालुकाध्यक्षा संगीता शेवाळे आदींसह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)