राज्याचा शिक्षणातील टक्का घसरला - सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 06:12 AM2018-05-29T06:12:29+5:302018-05-29T06:12:29+5:30
राज्यातील १३०० मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयासह शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत
पुणे : राज्यातील १३०० मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयासह शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. राज्याचा शिक्षणातील क्रमांक १६ वरून ३ वर आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दाव्याला कसलाही आधार नसून मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री त्याबाबत स्पष्टीकरण देत नाहीत, हे खेदजनक असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व सुप्रिया सुळे या शाळा बंद धोरणाबाबत खोटे बोलत असल्याचा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. सुळे यांनी हा आरोप या वेळी खोडून काढला. मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडून ट्युशन घ्यावी, असे वक्तव्य सुळे यांनी नुकतेच केले होते. तावडे यांनी कुणाची ट्युशन घ्यावी यावर त्यांनी काळपांडे यांची ट्युशन घ्यायला हवी. त्यांच्या काळातच सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनेक शाळा सुरू झाल्या होत्या, असे सांगितले.
पुणे जिल्ह्यातील काही समायोजित शाळांची माहिती देत सुळे यांनी शाळा बंदच्या निर्णयावर टीका केली.