सायंबाच्यावाडीत उभी राहणार राज्यातील पहिली ‘हरित इमारत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:09 AM2021-06-20T04:09:23+5:302021-06-20T04:09:23+5:30

बांधकामासाठी २० लाखाचा निधी मंजुर (रविकिरण सासवडे) बारामती : बारामती तालुक्यातील सायंबाच्यावाडीमध्ये ग्रामपंचायत सचिवालयाची राज्यातील पहिली ‘ग्रीन बिल्डींग’ ...

State's first 'green building' to be erected at Saimbachyawadi | सायंबाच्यावाडीत उभी राहणार राज्यातील पहिली ‘हरित इमारत’

सायंबाच्यावाडीत उभी राहणार राज्यातील पहिली ‘हरित इमारत’

Next

बांधकामासाठी २० लाखाचा निधी मंजुर

(रविकिरण सासवडे)

बारामती : बारामती तालुक्यातील सायंबाच्यावाडीमध्ये ग्रामपंचायत सचिवालयाची राज्यातील पहिली ‘ग्रीन बिल्डींग’ (हरित इमारत) उभारण्यात येणार आहे. यासाठी नुकतेच राज्य शासनाच्या वतीने २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कायमस्वरूपी दुष्काळी गाव ही ओळख पुसून मागील वर्षी सायंबाचीवाडी हे गाव पाणीदार म्हणून नावारुपाला आले होते. नवनवीन संकल्पना राबवत आदर्श गाव बनवण्यासाठी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी यानिमित्ताने आता कबंर कसली आहे.

सायंबाचीवाडी हे बारामती तालुक्यातील जिरायती पट्ट्यातील कायमस्वरूपी दुष्काळी गाव, मात्र मागील वर्षी ग्रामस्थ, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जलसंधारणाच्या कामांना गती दिली. त्याचा परिणाम म्हणून कधी नव्हे ते येथील पाझर तलाव पूर्णक्षमतेने भरले. हंडाभर पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या गावातील तलावात चक्क बोटिंग सुरू झाले. सायंबाच्यावाडीच्या नेमक्या याच यशस्वी संघर्षाची पाहणी सहा महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावाला भेट देऊन केली. यावेळी सरपंच प्रमोद जगताप यांनी ग्रामपंचायत सचिवालय इमारत बांधाण्यासाठी ‘ग्रीन बिल्डींग’चा प्रस्ताव उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला. पवार यांनी देखील या प्रस्ताव स्वीकारत एकूण ४२ लाखांच्या निधीपैकी पहिल्या टप्प्यात २० लाखांचा निधी मंजुर केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय स्तरावर बारामती येथे राज्यातील पहिली हरित इमारत (ग्रीन बिल्डींग) उभी राहणार आहे. या हरित इमारतीमध्ये कृत्रिम वीजेचा वापर, पाण्याचा व नैसर्गिक संसाधनांचा कमीत कमी वापर केला जातो. तसेच हरित इमारतीमध्ये घातक रसायनमुक्त बांधकाम पद्धतीचा वापर टाळला जातो. यामुळे आल्हाददायक व निरोगी वातावरण राखण्यास मदत होते. हरित इमारत बांधताना पूर्वी वापरलेल्या साहित्याचा पुनर्वापर सुद्धा केला जातो. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील या प्रस्तावाला नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून मान्यता दिली आहे.

---------------------

ग्रामपंचायत स्तरावर राज्यात पहिलीच इमारत सायंबाच्यावाडीमध्ये उभी राहत आहे. दुष्काळी गाव ही ओळख पुसून आम्हाला राज्यामध्ये सायंबाचीवाडी हे गाव विकासासबंधी वेगवेगळ्या पर्यावरण पूरक संकल्पना राबवणारे गाव म्हणून नावारूपाला आणायचे आहे. त्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न करत आहोत. हरित इमारत निर्मितीसाठी सर्व पातळ्या पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. केंद्र सरकाच्या आयजीबी म्हणजेच ‘इंडियन ग्रीन बिल्डींग कॉन्सील’ कडून हरित इमारतीस सिल्वर, गोल्डन व प्लॅटिनम अशी मानांकने देण्यात येतात. त्यापैकी प्लॅटिनम मानांकन मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी हरित इमारतीच्या दर्जाबाबत योग्य ती काळजी घेतली जात आहे.

- प्रमोद जगताप

सरपंच, सायंबाचीवाडी, ता. बारामती

---------------------------------

हरित इमारतीत या बाबींचा होणार समावेश...

- कृत्रिम उर्जा वापरात बचत, प्रदिपन उर्जेचा वापर

- शेडिंग डिव्हाइस, इन्सुलेटेड छप्पर, उच्च कार्यक्षमता ग्लेझिंगचा वापारामुळे कमी उष्णतेची निर्मिती

- अ‍ॅल्युमिनियम खिडक्यांऐवजी यु.पी.व्ही.सी. खिडक्यांचा वापर

- उष्णता परावर्तित करणाऱ्या नैसर्गिक रंगाचा वापर

- कृत्रिम वातानुकूलित यंत्राऐवजी जिओथर्मल कूलिंगचा वापर

- पाण्याचा कमी वापर करणे. ‘झीरो ग्रे वॉटर’ संकल्पना राबवणे

- फ्लाय अ‍ॅश मिश्रित सिमेंट, विटा, मातीचा वापर करणे

- नैसर्गिक स्रोतांचा वापर, टाकाऊ पदार्थांचा पुनवार्पर पारंपारिक उर्जेचा वापर कमी करणे

-------------------------------

हरित इमारतीचे फायदे...

- पाण्याच्या दैनंदिन वापरात २० ते ३० टक्के बचत

- उर्जेच्या वापरात ३० ते ४० टक्के बचत

- कार्बन डॉय ऑक्साईडच्या निर्मितीत ४० टक्क्यांपर्यंत बचत

- घन कचरा निर्मितीत ७० टक्के घट

- हरित गृह वायू उत्सर्जनामध्ये २५ टक्के घट

- इमारतीच्या देखभाल व दुरुस्ती खर्चात घट

- इमारतीतील रहिवाशांच्यासाठी अल्हाददायक वातावरण निर्माण करण्यास मदत

----------------------------

फोटो ओळी : सायंबाच्यावाडीमध्ये उभारण्यात येणाऱ्या ग्रामसचिवालयाच्या हरित इमारतीचे संकल्पचित्र

१९०६२०२१-बारामती-०१

Web Title: State's first 'green building' to be erected at Saimbachyawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.