‘सेल्फी’ आदेशाचा राज्यभरातून निषेध
By admin | Published: January 10, 2017 03:53 AM2017-01-10T03:53:03+5:302017-01-10T03:53:03+5:30
शालाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचा सेल्फी काढून तो संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या शासन निर्णयावर सडकून टीका
पुणे : शालाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचा सेल्फी काढून तो संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या शासन निर्णयावर सडकून टीका झाल्यानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, शासनाच्या ‘सेल्फी’ निर्णयाचा राज्यभरातील शिक्षक संघटनांनी सोमवारी निषेध नोंदवला. तसेच एकाही शिक्षकाने या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने शालाबाह्य मुलांची संख्या कमी करण्यासाठी उपाय म्हणून शिक्षकांना शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा
सेल्फी काढण्याची जबाबदारी
दिली.
मात्र, सेल्फी काढण्याच्या कल्पनेचा शिक्षक व शिक्षकेतर संघटनांकडूनही निषेध व्यक्त केला जात आहे. सोमवारपासून सेल्फी काढून तो संकेतस्थळावर अपलोड करणे अपेक्षित होते. परंतु, सेल्फी काढणे हे अशैक्षणिक काम असून, त्यामुळे शिक्षकांचा वेळ वाया जाणार
आहे.
शिक्षण विभागाने ‘सरल’मध्ये विविध प्रकारची माहिती भरून देण्याचे काम शिक्षकांवर सोपवले आहे. त्यात शिक्षण विभागाने सेल्फी काढण्याचे काम देण्यात आले. मात्र, त्याला शिक्षक संघटनांनी विरोध केला. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना याबाबतचे निवेदन पाठविले आहे.
शालाबाह्य मुलांचा शोधासाठी सेल्फी घेण्याची कल्पना अध्यादेशाच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना बंधनकारक केली. मात्र, काही शिक्षकांकडे स्मार्ट फोन नसल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे शिक्षकांनी तत्काळ स्मार्ट फोन घ्यावेत; अन्यथा संबंधितांना नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीच शिक्षण अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. याबाबतचे आॅडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामुळे शिक्षकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
(प्रतिनिधी)