टोलनाक्याच्या विरोधातील ठिय्या आंदोलन; ग्रामस्थ एकवटले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 12:20 AM2019-02-05T00:20:04+5:302019-02-05T00:20:25+5:30
पाटस (ता. दौंड) येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील टोलनाका प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन शांततेत केले.
पाटस : पाटस (ता. दौंड) येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील टोलनाका प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन शांततेत केले. पाटस, वरवंड, कुसेगाव, पडवी, रोटी, हिंगणीगाडा, वासुंदे, कुरकुंभ यासह अन्य काही गावांतील रहिवाशांना, तसेच छोट्या-मोठ्या व्यावसायिक वाहनांना टोलमुक्त करावे, या मागणीसाठी येथील कार्यकर्ते वसंतराव साळुंखे यांच्या पुढाकाराने ठिय्या आंदोलन झाले.
या आंदोलनात तालुक्यातील बहुतांशी ग्रामस्थ सहभागी झाले होते. एकंदरीतच टोलनाका प्रशासनाच्या विरोधात सर्व ग्रामस्थ एकवटले असून, टोल प्रशासन स्थानिक रहिवाशांवर करीत असलेला अन्याय एक दिवस त्यांच्या अंगलट येईल, असा सूर आंदोलकांत होता.
या वेळी वसंत साळुंके म्हणाले की, पाटसचा टोलनाका चुकीच्या ठिकाणी उभारला असून, तो बेकायदेशीर आहे. जनतेच्या हितासाठी आंदोलन करीत असून भविष्यात या आंदोलनाची व्याप्ती वाढवणार आहे यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.
लक्ष्मण दिवेकर, रमेश शितोळे यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात संभाजी देशमुख, रियास सय्यद, शंकर पवार, नानासाहेब फडके, अजय फडतरे यांच्यासह तालुक्यातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक सूरज बंडगर, मंडलाधिकारी प्रकाश भोंडवे टोल प्रशासनाला ग्रामस्थांनी निवेदन दिले.
दौैंड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अशोक फरगडे म्हणाले की, या टोलनाक्यावर तालुक्यातील जनतेसह इतर वाहनचालकांवर गुंडगिरी सुरू आहे.
तेव्हा लोकप्रतिनिधी काय करीत आहेत, असा प्रश्न उपस्थितीत करून लोकप्रतिनिधींनी याकामी लक्ष घालावे, असे फरगडे म्हणाले.
माजी सरपंच मनोज फडतरे म्हणाले की, टोलनाक्यावर
गुन्हे दाखल झाल्याशिवाय टोलप्रशासन सुधारणार
नाही. तेव्हा टोलनाक्याच्या विरोधात ग्रामस्थांनी
एकजुट केली पाहिजे.
लोकप्रतिनिधी काय करतात?
दौंड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अशोक फरगडे म्हणाले की, टोलनाक्यावर गुन्हेगारी वाढली, सर्वसामान्यांवर अन्याय होत आहे. तेव्हा लोकप्रतिनिधी काय करतात, असा प्रश्न उपस्थित करुन याकामी खासदार, आमदार यांनी लक्ष द्यावे, जेणेकरुन टोलनाक्याची मुजोरी मोडीत निघेल.