लोकमान्य टिळकांचा १०२ वर्षांपूर्वींचा पुतळा केसरीवाड्यातील टिळक अभ्यासिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:05+5:302021-07-24T04:09:05+5:30
पुणे : लोकमान्य टिळकांची जयंती आणि गुरुपोर्णिमा असा योग साधत साक्षात टिळकांसमोर बसून तयार केलेला त्यांचा पूर्णाकृती पुतळा ...
पुणे : लोकमान्य टिळकांची जयंती आणि गुरुपोर्णिमा असा योग साधत साक्षात टिळकांसमोर बसून तयार केलेला त्यांचा पूर्णाकृती पुतळा केसरीवाड्यातील टिळक अभ्यासिकेत शुक्रवारी (दि. २३) विराजमान झाला. आरामखुर्चीत बसलेला आणि हातात वर्तमानपत्र घेतलेल्या अविर्भावातील हा पुतळा पाहिल्यानंतर साक्षात टिळकच बसल्याचा भास होतो. इतका हुबेहूब हा पुतळा साकारला आहे. मुुंबईतील सरदार भवनात मूर्तिकार कै. केशव लेले यांनी १०२ वषार्पूर्वी म्हणजे १९१९ मध्ये हा पुतळा बनविला होता.
या पूर्णाकृती पुतळ्याविषयी आमदार मुक्ता टिळक, शैलेश टिळक, शिल्पकार कै. केशव लेले यांचे चिरंजीव यशवंतराव लेले, त्यांची कन्या डॉ. चित्रा लेले, शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी कुणाल टिळक आणि चैत्राली टिळक उपस्थित होते.
मूर्तिकार कै. केशव लेले यांनी हा पुतळा जुलै १९१९ मध्ये मुंबईतील सरदार भवन येथे साक्षात लोकमान्य टिळकांच्या समोर बसून प्लँस्टर आॅफ पँरिसमध्ये साकार केला आहे. लोकमान्यांचे निवासस्थान असलेल्या वास्तूचे नूतनीकरण होईल, तेव्हा हा पुतळा तेथे स्थापित करू असे लेले कुटुंबीयांनी सांगितले होते. आज गुरुपौर्णिमा आणि टिळक जयंतीच्या दिवशी पूर्णाकृती पुतळा अभ्यासिकेत विराजमान झाला आहे.
यशवंतराव लेले म्हणाले, माझे वडील मूळचे कोकणातले. मुंबईत काकांकडे आल्यानंतर गणपतीची मूर्ती तयार करीत असताना ते पुतळे करायला शिकले. त्यांनी पुष्कळ पुतळ्यांची निर्मित्ती केली. त्यांनी पुतळ्यांच्या प्रदर्शनानिमित्त इंग्लंड, अमेरिका आदी देशात प्रवास केला. वडिलांचे १९४५ मध्ये निधन झाले. त्यांच्यानंतर तो पुतळा आम्ही जीवापाड जपला. पण जागेअभावी १९९९ मध्ये तो पुण्यात मुलीकडे हलविला. माझ्यानंतर तो चांगल्या जागेत सुरक्षित रहावा अशी इच्छा होती. तो इथे व्यवस्थित राहील.
पुतळ्याचे नूतनीकरण करणारे शिल्पकार अभिजित धोंडफळे म्हणाले, शंभर वर्षे झाल्याने पुतळ्याची परिस्थिती नाजूक झाली होती. त्यावर रंगाचे थर जमा झाले होते, नूतनीकरणास एक महिना लागला. जशास तसे काम व्हायला पाहिजे, अशी लेले काकांची इच्छा होती. विशेष म्हणजे त्वचेचा गव्हाळ रंग देणे. मी केलेले काम काकांच्या पसंतीस उरतले ही माझ्यासाठी महत्वाची दाद आहे.
--------------------------
हा पुतळा पुणे शहराची शान
लोकमान्य टिळक हे आजवर त्यांच्या फोटोच्या स्वरूपात सगळ्यांसमोर होते. मात्र, ते हयात असताना त्यांना समोर बसवून प्रत्यक्षात साकारलेला हा पुतळा असल्याने त्याचे जास्त महत्त्व आहे. लोकमान्य टिळकांचे फोटो काढणे तत्कालीन छायाचित्रकारांसाठी आव्हानात्मक होते. त्यात शिल्पकारासाठी पुतळा साकारणे ही तर कसोटीच होती. लेले कुटुंबीयांनी पुतळा जपला आणि त्यांच्यामार्फत आज तो टिळकांच्या निवासस्थानी बसविला. हा पुतळा म्हणजे पुणे शहराची शान आहे.
- मुक्ता टिळक, आमदार
-------------------