मॉरिशसमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे २८ एप्रिलला अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 06:34 PM2023-04-27T18:34:25+5:302023-04-27T18:39:23+5:30
महाराष्ट्रातील असंख्य शिवप्रेमी या नेत्रदीपक सोहळ्यासाठी उपस्थित राहणार
पुणे: मॉरिशसमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्या २८ एप्रिलला अनावरण करण्यात येणार आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
मॉरिशसमध्ये सुमारे ७५ हजार मराठी बांधव असून, ते पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोकण भागांतील आहेत. या मंडळींनी मराठी परंपरा, संस्कृती जोपासली आहे. या मराठी बांधवांच्या सुमारे ५४ संघटना असून, या सर्व संघटनांचा मिळून मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन स्थापन केले आहे. या फेडरेशनची स्थापना १ मे, १९६० रोजी झाली. शिवजयंती, महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात येथे साजरे होतात. येथे एक महाराष्ट्र भवन सुद्धा उभारण्यात आले असून, त्याच्या विस्तारासंदर्भातील काही मागण्या आहेत. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यादृष्टीने काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे. या कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे.
मराठी लोकांना अभिमान वाटेल असा सोहळा...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२.५ फुटी पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण महाराष्ट्र भवन मोका मॉरिशस येथे संपन्न होत आहे. सर्व मराठी लोकांना अभिमान वाटावा असा हा सोहळा असून हा पुतळा मिळावा, यासाठी मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष असांत गोविंद व त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीने अथक परिश्रम घेतले. पुण्याहून या फेडरेशनचे संपर्क अधिकारी नंदा पंडित व उद्योजक संतोष पंडित त्याचबरोबर महाराष्ट्रातील असंख्य शिवप्रेमी या नेत्रदीपक सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.