Narendra Modi Temple ...अन् मोदींच्या मंदिरातला पुतळा रातोरात हटवला; समोर आलं महत्त्वाचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 09:52 AM2021-08-19T09:52:28+5:302021-08-19T09:53:04+5:30
statue in pm Narendra Modis temple in Pune removed overnight : पंतप्रधान मोदींचा पुतळा हटवल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घटनास्थळी
पुणे: देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर पुण्यात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिराची उभारणी करण्यात आली. औंध गावात उभारण्यात आलेल्या मंदिरात मोदींचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला. मात्र आता हा पुतळा हटवण्यात आला आहे. मोदींचा पुतळा रातोरात हटवण्यात आल्याची माहिती सकाळी समोर आली. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मंदिराजवळ पोहोचले. मोदींचा पुतळा भाजप कार्यालयात हलवण्यात आल्याचं समजतं. Statue in pm Narendra Modi temple in Pune Removed Overnight
औंध गावातील ॲड. मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून मयूर मुंडे व आणि कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून मोदी मंदिर उभारलं. परिसरातील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते १५ ऑगस्टला मंदिराचे उद्घाटन करण्यात आलं. या मंदिर उभारणीचं वृत्त देशात चर्चिलं गेलं. यावर बरीच टीकादेखील झाली. त्यानंतर भाजप नेतृत्त्वानं याची दखल घेतली. आज सकाळी औंधमधील मंदिर झाकण्यात आलं. त्यातील मोदींचा पुतळादेखील मुसळे यांच्या कार्यालयात नेण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नवस बोलायला आले, पण...
पंतप्रधान मोदींचा पुतळा हटवण्यात आल्याची माहिती समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंदिराजवळ धाव घेतली. त्यांनी या भागात उपरोधिक आंदोलन केलं. 'देशापुढे असलेले प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही साकडं घालायला मंदिरात आलो होतो. मात्र भाजपचा BJP देव काही केल्या आम्हाला दिसत नाहीए. पेट्रोल, डिझेल, सिलिंडरचे दर कमी होऊ दे, यासाठी नवस बोलायला आम्ही इथे आलो. पण देवच दिसत नसल्यानं आम्हाला अगदी भरून आलं,' अशी टोलेबाजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. देव चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
कशासाठी उभारण्यात आलं होतं मंदिर?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाप्रती फार मोठे योगदान आहे. त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे आज भारताला जागतिक स्तरावर चांगले स्थान प्राप्त झाले आहे. या आदर्श व्यक्तिमत्त्वाचे आचार-विचार जोपासले जावेत. त्यांच्या कार्यापुढे सर्वांनी नतमस्तक व्हावे. मोदी हे एक प्रकारे देव असल्यानेच त्यांचे मंदिर बांधण्यात आले आहे.”, असं ॲड. मधुकर मुसळे यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितलं होतं.