पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोर क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा पुतळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 05:33 AM2021-11-19T05:33:34+5:302021-11-19T05:34:41+5:30
सावित्रीबाई फुले यांचा पुतळा कुठे बसवावा याबद्दल मतमतांतरे आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी भुजबळ यांनी विद्यापीठाला भेट देत जागेची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील जागेतच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभा करावा, अशी सूचना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. येत्या ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याची उभारणी करण्याचा राज्य शासनाचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले यांचा पुतळा कुठे बसवावा याबद्दल मतमतांतरे आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी भुजबळ यांनी विद्यापीठाला भेट देत जागेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी खासदार समीर भुजबळ, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ. सुधाकर जाधवर, डॉ.संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. महेश आबाळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरी नरके यावेळी उपस्थित होते.
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील जागेत सावित्रीबाईंचा पुतळा उभारण्याबाबत शासन प्रयत्न करेल, असे भुजबळ म्हणाले. त्यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांचा पुतळा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत प्रशासनाची आणि विद्यापीठातील अधिकाऱ्यांची बैैठक घेऊन पुतळा बसविण्यासाठीची आवश्यक कार्यवाही केली जाईल.
‘हेरिटेज’ जागेत पुतळा...
nविद्यापीठाची मुख्य इमारत व सभोवतालचा परिसर ‘हेरिटेज’ आहे. मुख्य इमारतीच्या अगदी समोर भुयारी मार्ग आहे. विद्यापीठ इमारतीच्या परिसरात कोणतेही बांधकाम करण्यासाठी पुरातत्त्व खात्याची परवानगी घ्यावी लागते.
nइमारतीसमोरील मोकळी जागा
वनविभागाची आहे. त्यामुळे पुतळा बसवण्यासाठी वन आणि पुरातत्त्व विभागासह राज्यपाल कार्यालयाकडून काही परवानग्या घ्याव्या लागू शकतात.
n३ जानेवारीचा मुहूर्त गाठायचा असेल तर कमी कालावधीत अनेक परवानग्या मिळवाव्या लागतील.