"भोंगा, दंगा, पंगा आणि जातीय तेढीपासून दूर रहा", पुणे पोलिसांचे कवितेतून तरुणांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 02:16 PM2022-05-04T14:16:35+5:302022-05-04T14:19:09+5:30
पुणे पोलिसांचे तरुणांना आवाहन...
पुणे : सध्या राज्यभरात भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी या विषयाला हात घालत मस्जिदीवरील भोंगे बंद करण्यासाठी आंदोलन छेडले आहे. राज्यभर मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. ज्या मस्जिदीवर भोंगे वाजतील तिथे हनुमान चालिसा लावण्यात येईल असं मनसेकडून सांगण्यात आले आहे. राज्यात असं वातावरण असताना इथे युवकांनी कोणत्याही आंदोलनात जाऊ नका. तसेच भोंगा, पंगा, दंगा यापासून दूर रहा यासाठी पुणेपोलिसांनी आवाहन केले आहे. कविता लिहत पोलिसांनी हे आवाहन केले आहे.
पुणे पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही कविता पोस्ट केली आहे. त्या कवितेत पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे, तिथे तरूणांनी भोंगा, दंगा, पंगा तसेच जातीय तेढीपासून दूर राहिले पाहिजे असं सांगितले आहे. नेमकी ही कविता काय आहे ते पाहूया-
"हे तरुणाई, तुझ्यासाठी..!
पुण्यनगरी ही राजधानी असे सर्व शिक्षणाची संस्कृती शिकण्या येथे मांदीयाळी तरुणाईची नको आम्हा भोंगा, दंगा, पंगा अन जातीय तेढ सामाजिक सलोख्याची उभारु या मुहूर्तमेढ..!
गुण्यागोविंदे नांदण्या, एकमेकां समजून घेऊ, अवघे धरू सुपंथ..!"
हे तरुणाई, तुझ्यासाठी..!
— PUNE POLICE (@PuneCityPolice) May 4, 2022
पुण्यनगरी ही राजधानी असे सर्व शिक्षणाची
संस्कृती शिकण्या येथे मांदीयाळी तरुणाईची
नको आम्हा भोंगा, दंगा, पंगा अन जातीय तेढ
सामाजिक सलोख्याची उभारु या मुहूर्तमेढ..!
गुण्यागोविंदे नांदण्या, एकमेकां समजून घेऊ,
अवघे धरू सुपंथ..!#पुणेपोलीस
अनेक आंदोलनात युवकांची डोकी भडकावून त्यांना तिथं आणलं जाते. त्यांच्यामार्फत घोषणा दिल्या जातात. पण यावेळी युवकांना त्यांचे किती मोठे नुकसान होत आहे, हे कळत नसतं. त्यामुळे तरूणांनी कोणत्याही जातीय आंदोलनापासून दूर रहावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.