पाण्यासाठी स्वार्थी लोकांपासून दूर राहा
By admin | Published: March 27, 2017 02:14 AM2017-03-27T02:14:44+5:302017-03-27T02:14:44+5:30
दौंडच्या पूर्व भागातील शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वार्थी लोकांपासून दूर रहावे, असे आवाहन कामगार नेते शिवाजी काळे यांनी
दौंड : दौंडच्या पूर्व भागातील शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वार्थी लोकांपासून दूर रहावे, असे आवाहन कामगार नेते शिवाजी काळे यांनी केले.
आलेगाव येथे खडकवासला कालव्याच्या पाण्याचे पूजन प्रसंगी ते बोलत होते. सोनवडी व खोरवडी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाण्याचा फार मोठा उपयोग होतो.
या बंधाऱ्यातून पूर्व भागातील सुमारे २५ ते ३० गावांतील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा उपयोग होतो. परंतु हक्काचे पाणी मिळविण्यासाठी गेल्या ५ वर्षांपासून शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. परंतु तालुक्यातील काही स्वार्थी व्यक्ती या भागात पाणी मिळू नये, यासाठी राजकारण करीत आहेत. तेव्हा अशा राजकीय लोकांपासून शेतकऱ्यांनी दूर रहावे.
भीमा नदीमुळे नदीकाठच्या गावांना वर्षभर पुरेसे पाणी मिळते मात्र उन्हाळ्यामध्ये टंचाईच्या काळात या भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो.
परिणामी सोनवडी आणि खोरवडी येथील बंधाऱ्यातील पाणी शेतीसाठी वरदान ठरते. मात्र अलीकडच्या काळात हक्काचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांना मिळत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट, रासपाचे आमदार राहुल कुल, भाजपाचे ज्येष्ठ नेते वासुदेव काळे यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी भामा आसखेडचे पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. परंतु जादा सोडलेले पाणी काही स्थानिक लोकांनी बंधाऱ्यांना ढापे टाकून अडविल्याने हे पाणी शेवटपर्यंत पोहचू शकले नाही; तरी देऊळगावराजे, शिरापूर या भागात पाणी पोहोचणे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे काळे म्हणाले.
या वेळी भाऊसाहेब काळे, सुभ्रदा काळे, उमेश काळे, राहुल चितारे, माणिक काळे, अशोक कदम, गोविंद कदम, श्रीकांत गुणवरे, शिवाजी ढमढेरे, मोहन काळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)