SSC Exam : फर्ग्युसन रोडवरील दुहेरी वाहतूक स्थगित; पदपथाचे काम सुरू : दहावीच्या परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 08:08 PM2020-03-02T20:08:49+5:302020-03-02T20:09:57+5:30
SSC Exam : दहावीच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू होत असल्याने वाहतूककोंडी टाळण्यासाठी दुहेरी वाहतूक स्थगित
पुणे : फर्ग्युसन रोडवर संत श्री ज्ञानेश्वर पादुका चौक ते वीर चापेकर चौक (कृषी महाविद्याालय, म्हसोबा गेट) दरम्यान असलेली वाहतूक दुहेरी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली. मात्र, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ललित महल चौक ते म्हसोबा गेट चौकादरम्यान उजवीकडे पदपथाचे काम सुरू असल्याने, तसेच दहावीच्यापरीक्षा मंगळवारपासून सुरू होत असल्याने वाहतूककोंडी टाळण्यासाठी या भागातील दुहेरी वाहतूक स्थगित करण्यात आली.
फर्ग्युसन रस्त्यावरील संत श्री ज्ञानेश्वर पादुका चौक ते वीर चापेकर चौकादरम्यान दुहेरी वाहतूक योजना सुरू करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी गुरुवारी (दि. २७) घेतला. त्यानंतर या रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ललित महल हॉटेल चौक ते वीर चापेकर चौकादरम्यान उजव्या बाजूला पदपथाचे काम सुरू करण्यात आल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली. त्यामुळे या भागात वाहतूककोंडी होत होती़ त्याचा ताण फर्ग्युसन रोडवरील वाहतुकीवर येत आहे़ ज्ञानेश्वर पादुका चौकापासून अगदी डेक्कनपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे गेले दोन दिवस दिसून येत होते़ दहावीचीपरीक्षा मंगळवारपासून (दि. ३) सुरू होणार आहे. बारावीची परीक्षा सध्या सुरू आहे़ वीर चापेकर चौकातून संत श्री ज्ञानेश्वरमहाराज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना जागा उपलब्ध होत नसल्याने दुहेरी वाहतूक तूर्तास स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
दुहेरी वाहतूक योजना सुरू केल्यानंतर या भागात पदपथाचे काम सुरू असल्याने वाहनचालकांना पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले. वाहतुकीचे नियोजन करताना काही त्रुटी आढळून आल्या. वाहनांची कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले. कोंडीमुळे वाहनांची रांग फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौकापर्यंत पोहोचल्याचे आढळून आले, असे शिवाजीनगर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी सांगितले.
----------------------
०००