घरीच राहा, हसत राहा, कोरोनाशी लढण्यासाठी खंबीर राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:19 AM2021-05-05T04:19:14+5:302021-05-05T04:19:14+5:30

----------------------- जगावर कोरोना ही फार मोठी आपत्ती आली आहे. आयुष्यात सर्वांना ढवळून काढणारा असा हा आजार आहे. आपल्या ...

Stay home, keep smiling, be strong to fight Corona | घरीच राहा, हसत राहा, कोरोनाशी लढण्यासाठी खंबीर राहा

घरीच राहा, हसत राहा, कोरोनाशी लढण्यासाठी खंबीर राहा

Next

-----------------------

जगावर कोरोना ही फार मोठी आपत्ती आली आहे. आयुष्यात सर्वांना ढवळून काढणारा असा हा आजार आहे. आपल्या धारणा, नैतिकता, विज्ञानाधिष्ठित या सर्वच गोष्टी पणाला लागल्या आणि यात विज्ञानाचे पारडे जड झाले. सर्व धर्म, वर्ण, गरीब श्रीमंत हा भेदभाव राहिला नाही. सर्वांच्याच आयुष्यातला हा काळवंडलेला भाग आहे. आजवर असे संकट कुणीच कधी पाहिलेले नव्हते. मात्र याही परिस्थितीत हार मानायची नाही. हे सांगण्यासाठी कोरोना काळातही लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी जगभरातून अनेक व्यंगचित्रकारांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातून माणसाचं मन बळकट होण्यास मदत होत आहे. व्यंगचित्रकाराची नजर कोरोनासारख्या गंभीर आजारामधला वेगळेपणा देखील टिपते. बऱ्याचदा व्यंगचित्रे ही प्रचारकी थाट्यात रेखाटली जातात. परंतु जर ती हसवणारी, गुदगुदल्या देणारी असतील तर तुम्हाला दु:ख विसरायला लावतात.

- रवींद्र राणे, व्यंगचित्रकार

----------------------

व्यंगचित्रे ही नेहमीच मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचेही काम करतात. कोरोनाकाळात ‘सुरक्षित राहा आणि घरातच राहा’ असा संदेश व्यंगचित्रांच्या माध्यमातून देत आहे. मनात सकारात्मक विचार ठेवा. जगायचं की मरायचं, राहायचं की जायचं? हे तुम्ही ठरवायचं हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. घराबाहेर पडा आणि लस घ्या. सुरक्षित राहा हेच सांगितले.

-दिनेश धनगव्हाण, व्यंगचित्रकार

------------

कोरोना हा व्यंगचित्रकारांसाठीचा ताजा विषय आहे. कोणत्याही विषयातून विनोद, विसंगती, अतिशयोक्ती मांडण्याचे काम व्यंगचित्रकार करतात. ही आमची शस्त्रे आहेत. भिऊ नका, हलके व्हा, असे सांगून लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. आॅक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, देशी दारू असे विषय व्यंगचित्राच्या माध्यमातून मांडले आहेत.. संकट येतातच त्यावर मात करायला शिका, हे देखील सांगण्याचा प्रयत्न केलाय.

- राजीव गायकवाड, व्यंगचित्रकार

----------

कोरोनाविषयी दोन माध्यमातून व्यंगचित्रे केली. बेरोजगारी, बिहार निवडणुका, आॅक्सिजनचा अभाव, झाडे लावा असे अनेक विषय हाताळले. राजकीय टीकाटिप्पणी, कोरोनाच्या गमतीजमती याबरोबरच समाजप्रबोधन करण्याचा देखील प्रयत्न केला. कोरोना घातक विषय असला तरी कोरोनाने बरंच काही शिकवलं हे देखील मांडले. व्यंगचित्रकाराच्या नजरेने कोरोनाला केंद्रस्थानी ठेवून अनेक विषयांना कुंचल्यावर रेखाटले.

- घनश्याम देशमुख, व्यंगचित्रकार

----------

प्रत्येक व्यंगचित्रकाराचा स्वभाव वेगळा असतो. म्हणजे त्याची व्यक्त होण्याची भाषा भिन्न असते. कुणी राजकीय, सामाजिक, निखळ हसू आणणारी किंवा काही एक संदेश देणारी व्यंगचित्र रेखाटते. त्यातही टोकदार, सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांवर टीका करणारी, नर्मविनोदी चिमटे काढणारी, समाजाला तिखट बोल सुनावणारी अशा व्यंगचित्रांच्या अनेक शैली असतात. गेल्या वर्षभरात कोरोना हा विषय सर्वच व्यंगचित्रकारांनी हाताळला. मी प्रामुख्याने मुले आणि कुटुंब केंद्रस्थानी ठेवून व्यंगचित्रांच्या माध्यमातून कोरोनावर भाष्य केले. एकेकाळी आपण मुलांना ‘जा बाहेर जाऊन मोकळ्या हवेत खेळा’ असे म्हणायचो, पण आज चला आता घरी जाऊन मोकळा श्वास घेऊ यात असे म्हणण्याची वेळ आलीये. अशा प्रकारे त्यातील मर्म उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

- चारुहास पंडित, व्यंगचित्रकार

-----------------------------------------------------------------------------------------------------------

Web Title: Stay home, keep smiling, be strong to fight Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.