स्मोकर्सच्या बाजूला थांबल्यानेही होतो कर्करोग; तज्ज्ञांचे मत, डॅाक्टर म्हणतात धूम्रपान टाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 10:13 AM2023-12-01T10:13:51+5:302023-12-01T10:14:21+5:30
फुप्फुसाच्या कॅन्सरने दगावणारे अंदाजे ८० टक्के रुग्ण हे धूम्रपान करणारेच असतात
पुणे : धूम्रपान हे फुप्फुसाचा कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण मानले जाते. फुप्फुसाच्या कॅन्सरने दगावणारे अंदाजे ८० टक्के रुग्ण हे धूम्रपान करणारेच असतात. म्हणून सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण १५ ते ३० टक्क्यांहून अधिक असते हे आपल्याला माहीत आहे. मात्र, धूम्रपान न करता केवळ धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहून देखील कॅन्सरचा धोका कायम असतो, असे कॅन्सर तज्ज्ञांचे मत आहे.
जाे धूम्रपान करणाऱ्यांजवळ थांबताे त्यामुळे धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात देखील थेट तंबाखूचा धूर जात असतो. पहिल्या टप्प्यात हा कर्करोग फुप्फुसामध्ये आढळतो. परंतु शरीराच्या इतर भागांमध्ये पसरत नाही. सुरुवातीच्या टप्प्यात उपचार केल्याने रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. दुसऱ्या टप्प्यात, लिम्फ नोड्ससह फुप्फुसामध्ये हा कर्करोग पसरल्याचे दिसून येते.
फुप्फुसाच्या कर्करोगाचे एकदा निदान झाल्यावर, या रोगाचा किती प्रसार झाला हे शोधणे महत्त्वाचे असते. यासाठी, फुप्फुसाच्या कर्करोगाच्या अवस्थेचे मूल्यांकन केले जाते आणि हा रोग कोणत्या टप्प्यात आहे, हे लक्षात आल्यावर त्याआधारे उपचार पद्धतीचे नियोजन करण्यात येते. कर्करोगाचा प्रकार, ट्यूमरचा आकार, तो किती प्रमाणात पसरला आणि रुग्णाची स्थिती यावर हे उपचार अवलंबून असतात. - डॉ. रविकुमार वाटेगावकर, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट
फुप्फुसाच्या कर्करोगाचे दाेन प्रकार
‘स्मॉल सेल’ आणि ‘नॉन-स्मॉल सेल’ हे फुप्फुसाच्या कर्करोगाचे दाेन प्रकार आहेत. यापैकी ‘स्मॉल सेल’ फुप्फुसाच्या कर्करोगाचे दोन प्रमुख टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात कर्करोग फक्त एका फुप्फुसात किंवा त्याच बाजूच्या जवळच्या ‘लिम्फ नोड्स’मध्ये मर्यादित प्रमाणात आढळतो, तर दुसऱ्या टप्प्यात त्याचा प्रसार हा एका फुप्फुसात पूर्ण, तसेच दुसऱ्या बाजूच्या फुप्फुसाच्या उलट बाजूच्या ‘लिम्फ नोड्स’पर्यंत, फुप्फुस द्रवापर्यंत आणि दूरच्या अवयवांमध्ये व ‘बोन मॅरो’मध्ये होतो.
नॉन-स्मॉल सेल’ फुप्फुस कर्करोगाचे चार मुख्य टप्पे
पहिल्या टप्प्यात कर्करोग फुप्फुसात आढळतो, परंतु तो फुप्फुसांच्या बाहेर पसरत नाही. तर दुसऱ्या टप्प्यात कर्करोग फुप्फुसात व जवळच्या नोड्समध्ये आढळतो. कर्करोग छातीच्या मध्यभागी फुप्फुसात आणि ‘लिम्फ नोड्स’मध्ये असतो, तेव्हा त्याला तिसरा टप्पा म्हणतात. शेवटच्या, म्हणजे चौथ्या टप्प्यात कर्करोग दोन्ही फुप्फुसांमध्ये, फुप्फुसांच्या आसपासच्या भागात किंवा दूरच्या अवयवांमध्ये पसरतो.