दिवसा रेकी करून पहाटे करायचे चोरी; तामिळनाडूच्या दोघा भावांना ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 01:41 PM2024-06-18T13:41:39+5:302024-06-18T13:42:25+5:30

विश्रांतवाडी, विमानतळ, लोणीकंद, भोसरी पोलीस ठाण्यातील ९ गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी १९ लॅपटॉप, ६३ मोबाईल, ५ डिजिटल घड्याळे असा ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला

Stealing in the early morning by doing Reiki during the day; The two brothers of Tamil Nadu were shackled | दिवसा रेकी करून पहाटे करायचे चोरी; तामिळनाडूच्या दोघा भावांना ठोकल्या बेड्या

दिवसा रेकी करून पहाटे करायचे चोरी; तामिळनाडूच्या दोघा भावांना ठोकल्या बेड्या

पुणे : दिवसा रेकी करून पहाटेच्या सुमारास चोरी करणाऱ्या तामिळनाडूच्या दोघा भावांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. पहाटे पीजी (पेइंग गेस्ट) मधून हे चोरटे महागडे लॅपटॉप, मोबाइल आणि डिजिटल घड्याळांची चोरी करत होते. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांच्या ऐवजावर प्रामुख्याने हे चोरटे डल्ला मारत होते.

बाबू राममूर्ती बोयर (२९) आणि सुरेश राममूर्ती बोयर (२४, सध्या रा. कदमाक वस्ती, लोणी काळभोर, मूळ रा. तामिळनाडू) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपी भावांची नावे आहेत. विश्रांतवाडी, विमानतळ, लोणीकंद आणि भोसरी पोलिस ठाण्यातील ९ गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी १९ लॅपटॉप, ६३ मोबाईल, पाच डिजिटल घड्याळे असा ३१ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

मागील काही दिवसांपासून शहरातील पीजीमध्ये वास्तव्यास असलेल्या तरुणांचे लॅपटॉप, मोबाइल, महागडी घड्याळे पहाटेच्या वेळी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. आयटी क्षेत्रात काम करणारे तरुण रात्री उशिरापर्यंत काम करत असतात, काही कारणामुळे दरवाजा उघडा राहिल्याची संधी मिळताच, हे दोघे चोरटे क्षणाचाही विलंब न करता सफाईदारपणे चोरी करून पोबारा करत होते. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात देखील याबाबतचा एक गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा तपास पोलिस करत होते.

दरम्यान, पोलिस कर्मचारी संजय बादरे, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांना धानोरी रोड परिसरात दोन संशयित व्यक्ती थांबल्याची माहिती मिळाली. पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलिस हवालदार दीपक चव्हाण, बबन वणवे, कर्मचारी यशवंत किर्वे, वामन सावंत, संदीप भोसले, संदीप देवकाते, शेखर खराडे यांच्या पथकाने बाबू आणि सुरेश यांना ताब्यात घेतले. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव, शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पोलिसांनी केली.

Web Title: Stealing in the early morning by doing Reiki during the day; The two brothers of Tamil Nadu were shackled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.