महामार्गालगतच्या नळातून पाणी चोरून विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:11 AM2021-03-26T04:11:03+5:302021-03-26T04:11:03+5:30
बाणेर परिसरामधील कामगार वर्ग, तसेच सूस गाव येथील ग्रामस्थ यांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी अनाधिकृतरीत्या तयार केलेल्या नळाच्या साहाय्याने पाणी ...
बाणेर परिसरामधील कामगार वर्ग, तसेच सूस गाव येथील ग्रामस्थ यांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी अनाधिकृतरीत्या तयार केलेल्या नळाच्या साहाय्याने पाणी दिले जात आहे.
बीटवाईजजवळ नळावर सूस, म्हाळुंगे, बाणेर परिसरातील नागरिक पाणी भरण्यासाठी महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्यावर गाडी लावून थांबतात. सूसगाव परिसरासाठी पुणे महापालिकेच्या वतीने अवघे ७० हजार लिटर पाणी देण्यात येते. यामुळे या गावांमध्ये सात दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी उपलब्ध होते. यामुळे या गावांमधील नागरिक पाण्यासाठी बाणेर परिसरातील धोकादायक असलेल्या नळावर पाणी घेण्यासाठी येतात.
सूस-म्हाळुंगे गावासाठी पुणे महापालिकेने पाणीपुरवठा वाढवून द्यावा, तसेच या गावातील नागरिकांना पाणी मिळण्यासाठी गावाजवळ अधिकृत पाणीपुरवठ्याची लाईन देण्यात यावी.
महामार्गालगत अनधिकृतरीत्या काढण्यात आलेला नळ बंद करण्यात यावा, तसेच रस्त्यावर वाहने लावण्यात येऊ नयेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.
लहू बालवडकर म्हणाले की, सूसगाव व म्हाळुंगे गाव तसेच बाणेर परिसरातील कामगार वर्गासाठी महापालिकेने नळांची व्यवस्था करावी.
-------------------
फोटो : महामार्ग लगत सर्विस रस्त्यावर अनधिकृतरीत्या नळाची जोडणी करून पाण्याची होत असलेली चोरी यामुळे वाहतूककोंडीचा देखील प्रश्न निर्माण होतो.