आधार नोंदणीसाठी उसळली गर्दी : नागरिकांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 02:37 AM2017-09-09T02:37:43+5:302017-09-09T02:37:58+5:30
आधार कार्ड नोंदणी तसेच दुरुस्तीच्या दोन दिवसीय कामकाजाला धनकवडी येथील क्षेत्रीय कार्यालयात सुरुवात झाली आहे. त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.
धनकवडी : आधार कार्ड नोंदणी तसेच दुरुस्तीच्या दोन दिवसीय कामकाजाला धनकवडी येथील क्षेत्रीय कार्यालयात सुरुवात झाली आहे. त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.
जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाच्या वतीने आधार कार्ड नोंदणी तसेच दुरुस्तीचे दोन दिवसीय शिबिराला सकाळी दहा वाजता धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात सुरुवात झाली आहे.
आधार कार्डामध्ये दुरुस्ती बरोबरच नोंदणीलादेखील खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी
दिसून येत होती. येथे क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने चोख व्यवस्था केली होती. या ठिकाणी सहा मशीन येणार होत्या. मात्र सकाळी चारच मशीन पोहोचल्या. तसेच दुपारनंतर एक मशीन मिळाल्यामुळे गर्दी आवाक्यात आली.
याबद्दल क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त युनुस पठाण यांनी सांगितले, की या ठिकाणी सहा मशीन येणार होत्या. मात्र सकाळी चारच मशीन पोहोचल्या होत्या. सकाळी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाच्या वतीने काही दिवसांतच महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये कायमस्वरूपी एक मशीन आॅपरेटर मिळणार आहे.
याबाबत नगरसेवक विशाल तांबे यांनी सांगितले, की अनेक नागरिकांची अद्याप आधार कार्ड नोंदणीच झालेली नाही. तसेच सुरुवातीच्या काळात घाईगडबडीत अनेक नागरिकांच्या आधार कार्ड नोंदणीमध्ये नाव पत्ता तसेच जन्मतारीख यामध्ये चुका झालेल्या आहेत.
खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांना आधार कार्ड संदर्भात काम आहे. यात एका मशीनवर एका दिवसात जास्तीत जास्त ६० लोकांचीच नोंदणी किंवा दुरुस्ती होत असते. आताच्या उपलब्ध मशीन प्रमाणे दोन दिवसांत पाचशे ते साडेपाचशे लोकांच्या आधार कार्डाचे काम होऊ शकणार आहे. आज दिवसभरात नोंदणी/दुरुस्तीसाठी हजाराच्या वर नागरिक केंद्रात पोहोचले मात्र गर्दी व रांग पाहून माघारी वळले.
आधार कार्ड सर्व ठिकाणी अनिवार्य केल्याने याच्या नोंदणीसाठी खासगी केंद्रांवर नोंदणी किंवा दुरुस्तीसाठी २०० ते ३०० रुपये वसूल केले जात आहेत. प्रशासनाने तत्काळ मशीन व केंद्रांची संख्या वाढवल्यास नागरिकांची लूट थांबणार आहे.