पेठांमध्ये होतोय कोंडमारा, चिंचोळ्या रस्त्यांवर जड वाहने; पार्किंगचा प्रश्न, वाहतूककोंडीचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 03:16 AM2017-12-03T03:16:02+5:302017-12-03T03:16:10+5:30

शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील अरुंद रस्ते, वाहनतळ हाकेच्या अंतरावर असूनही रस्त्यांच्या दुतर्फा पार्क केली जाणारी वाहने यामुळे रस्त्यांना वाहनांचा पडत असलेला विळखा, पदपथांवर केले जाणारे अतिक्रमण हे चित्र अद्यापही बदललेले नाही.

Steeps in pits, heavy vehicles on narrow streets; Parking questions, traffic troubles | पेठांमध्ये होतोय कोंडमारा, चिंचोळ्या रस्त्यांवर जड वाहने; पार्किंगचा प्रश्न, वाहतूककोंडीचा त्रास

पेठांमध्ये होतोय कोंडमारा, चिंचोळ्या रस्त्यांवर जड वाहने; पार्किंगचा प्रश्न, वाहतूककोंडीचा त्रास

Next

- नम्रता फडणीस/ राजानंद मोरे

पुणे : शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील अरुंद रस्ते, वाहनतळ हाकेच्या अंतरावर असूनही रस्त्यांच्या दुतर्फा पार्क केली जाणारी वाहने यामुळे रस्त्यांना वाहनांचा पडत असलेला विळखा, पदपथांवर केले जाणारे अतिक्रमण हे चित्र अद्यापही बदललेले नाही. किंबहुना दिवसागणित या समस्येमध्ये वाढच होत चालल्याने पेठांचा कोंडमारा होऊ लागला आहे. वाहतुकीचा बोजवारा उडत चालल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणेही मुश्कील होऊ लागले आहे.
महापालिकेकडून केवळ प्रमुख रस्त्यांचा विचार केला जातोय; मात्र पेठांचा श्वास असलेल्या अरुंद गल्ल्या आणि बोळांमध्ये वाहतूककोंडीच्या उद्भवणाºया समस्यांचे काय? हा
प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे.
या रस्त्यांवर मूलभूत सोयीसुविधांचा असलेला अभाव आणि वाहनतळामध्ये वाहनांच्या पार्किंगसाठी असलेली अपुरी जागा या बाबींमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी वाहतूक शाखाही ‘हतबल’ झाली आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शहरातील पेठांचा श्वास असलेल्या गल्लीबोळांमध्ये होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अद्यापही तोडगा निघालेला नाही. सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, महात्मा फुले पेठ, रविवार पेठ या भागांमध्ये ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता अरुंद रस्त्यांवर एका बाजूला पार्क केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा विळखा रस्त्यांना पडलेला दिसला.
गणेश पेठेतील संपूर्ण रस्ता वाहनांनी ब्लॉक झाल्याने पादचाºयांना रस्त्यांवरून मार्ग काढणेदेखील मुश्कील झाले होते. नारायण पेठेमध्ये मोदी गणपतीच्या बाजूस तसेच पुणे मराठी ग्रंथालयाच्या मागील बाजूला महापालिकेचा वाहनतळ आहे; मात्र त्याच्या बाहेरच्या बाजूलाच दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर पार्क केल्याचे दिसून आले.

लक्ष्मी रस्त्यावरच्या चारशे मीटर अंतरात ‘वॉकिंग प्लाझा’ सुरू करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाने वाहतूक शाखेला एक पत्र दिले आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. पार्किंग कुठे असेल, वन वे कुठे करायचा, वाहतुकीचे नियोजन कसे केले जाईल, याचा अभ्यास सुरू आहे. ते झाल्यानंतर वाहतूक शाखेला प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
- राजेंद्र राऊत,
पथ विभागप्रमुख


पेठांमधील रस्त्यांवर मूलभूत सोयीसुविधांचाच मोठा अभाव आहे. वाहनतळांमधली जागा अपुरी असल्याने रस्त्यावर पार्किंग करण्याशिवाय पर्याय नाही. तरीही आम्ही वाहतुकीचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. यापुढील काळात वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी अधिक मनुष्यबळाचा वापर केला जाईल. महापालिका पार्किंग धोरण आणण्याचा विचार करीत आहे, त्याने परिस्थितीत बदल होईल.
- अशोक मोराळे,
पोलीस उपायुक्त
वाहतूक शाखा

Web Title: Steeps in pits, heavy vehicles on narrow streets; Parking questions, traffic troubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे