वडिलांच्या मृत्यूनंतर सावत्र मुलाचा पराक्रम; आईच्या खात्यातील तब्बल ११ काेटी चोरले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 10:27 AM2023-02-10T10:27:07+5:302023-02-10T10:27:14+5:30
माेबाईल क्रमांकाचा गैरवापर करून म्युच्युअल फंड खात्यातील सर्व रक्कम स्वत:च्या बँक खात्यात जमा केली
पुणे : औंध परिसरात राहणाऱ्या एका सावत्र मुलाने वडिलांच्या मृत्यूनंतर सावत्र आईच्या बँक खात्यावर वडिलांनी ठेवलेल्या ११ काेटी ४० लाख २८ हजार रुपयांचा परस्पर अपहार केल्याचा प्रकार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करा, असा आदेश न्यायालयाने दिला. त्यावरून पाेलिसांनी घटनेच्या दाेन वर्षांनंतर मुकुंद अशाेक कैरे (वय ५१, रा. नाेएडा, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपीला अटक केलेली नाही. याबाबत चतु:श्रृंगी पाेलिस ठाण्यात आरती अशाेक कैरे (वय ७०) यांनी सावत्र मुलाविराेधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना दि. ९ ते १२ ऑक्टोबर २०२० दरम्यान घडली.
अधिक माहितीनुसार, आराेपी मुकुंद कैरे हा तक्रारदार यांचा सावत्र मुलगा आहे. त्यांचे पती अशाेक कैरे हे हयात नाहीत. त्यांनी पत्नीच्या भविष्यासाठी केलेली म्युच्युअल फंड खात्याच्या गुंतवणुकीतील रक्कम ११ काेटी ४० लाख २८ हजार रुपये ही ठेवली हाेती. ही रक्कम ९ ते १२ ऑक्टोबर २०२० या दरम्यान मुकुंदने काढून घेतली. त्यासाठी त्याने ऑगस्ट २०२० मध्ये अशाेक कैरे यांचे नावाचा बनावट ई-मेल आयडी तयार केला. त्याद्वारे मुकुंदने संबंधित वेगवेगळ्या म्युच्युअल फंड खात्याचा अशाेक कैरे यांचा नाेंदणीकृत माेबाईल क्रमांक बदलून त्यात आराेपीने त्याचा स्वत:चा माेबाईल क्रमांक टाकला. ताे माेबाईल क्रमांक अशाेक कैरे यांचाच असल्याचे भासवून रजिस्टर्ड केला व त्यानंतर त्याने सदरचा बनावट ई-मेल आयडी व बदलेला रजिस्टर्ड माेबाईल क्रमांकाचा गैरवापर करून म्युच्युअल फंड खात्यातील सर्व रक्कम त्याला काेणताही अधिकार नसताना स्वत:च्या बँक खात्यात जमा करून घेतली. पुढील तपास सहायक पाेलिस निरीक्षक एस. झरेकर करीत आहेत.