पुण्यात टप्प्याटप्प्याने 'अनलॉक' करा; अजितदादांसोबतच्या बैठकीत भूमिका मांडणारः महापौर मुरलीधर मोहोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 06:43 PM2021-05-25T18:43:49+5:302021-05-25T19:53:57+5:30
फक्त वीकेंड लॉकडाऊन मध्ये सूट द्या :पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड रिस्पॉन्स चा बैठकीत मांडली भूमिका
दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता सरसकट अनलॉक करू नये अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे. येत्या शुक्रवारी होणाऱ्या पालकमंत्री अजित पवार यांचा बैठकीत ही भूमिका मांडणार असल्याच त्यांनी सांगितलं आहे.
पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड रिस्पॉन्स आणि महापालिकेतील अधिकारी तसेच पदाधिकारी यांचा मध्ये आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तिसऱ्या लाटेची तयारी तसेच लसीकरण या विषयावर या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी बोलताना महापौरांनी ही भूमिका मांडली आहे.
पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड रिस्पॉन्स चा वतीने आणि मराठा चंबर्स फॉर इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर चा वतीने लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांना कंपनी मध्ये जायला परवानगी देणे , तसेच इतर सोयीसुविधा सुरू करणे याची मागणी करण्यात आली. या मागणी बाबत बोलताना शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
त्यांची भूमिका मांडताना मोहोळ म्हणाले ," गेल्या काही दिवसांमध्ये कशा पद्धतीने आपण लॉकडाऊन त्यातून पुन्हा अनलॉक आणि पुन्हा लॉकडाऊन मध्ये कसे गेलो हे अनुभवले आहे.त्यातून हे लक्षात आले आहे की तातडीने पूर्ण अनलॉक करून उपयोग नाही. टप्प्या टप्प्याने हा अनलॉक केला गेला पाहिजे. सुरुवातीला फक्त जे शनिवार रविवारी अत्यावश्यक दुकानं संपुर्ण बंद असतात ती सुरू करावीत. त्या नंतर हळू हळू सूट द्यावी अशी आमची भूमिका आहे. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत मी ही भूमिका मांडणार आहे. "
लसीसाठी लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट
दरम्यान लसिकरणासंदर्भात सिरम इन्स्टिट्यूट महापालिकेला लस द्यायला तयार आहेत. मात्र त्यांनी यासाठी केंद्राकडून परवानगी मागायची भूमिका घेतली आहे.यासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा झाली असून येत्या दोन दिवसांमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट होऊ शकते अशी माहिती महापौरांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.