निवडणुकीच्या दिशेने एक ‘कदम’
By admin | Published: March 1, 2016 01:46 AM2016-03-01T01:46:03+5:302016-03-01T01:46:03+5:30
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, विद्यार्थी अशा सर्व घटकांसाठी विविध योजनांची खैरात करणारे करणारे, १०० बसची खरेदीची तरतूद करण्यात आलेले
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, विद्यार्थी अशा सर्व घटकांसाठी विविध योजनांची खैरात करणारे करणारे, १०० बसची खरेदीची तरतूद करण्यात आलेले ५ हजार ७४८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सोमवारी मुख्य सभेला सादर केले. आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडलेल्या अंदाजपत्रकामध्ये स्थायी समितीने ५४९ कोटींची वाढ केली आहे.
महापालिकेचे २०१६-१७ या वर्षासाठी स्थायी समितीने तयार केलेले अंदाजपत्रक मुख्य सभेसमोर मांडण्यात आले. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अंदाजपत्रक असल्याने पुणेकरांना ‘फिल गुड’ अशा योजनांचा समावेश या अंदाजपत्रक करण्यात आला आहे. मागील वर्षी स्थायी समितीने ४ हजार ४७९ रुपयांचे अंदाजपत्रक मांडले होते, त्यामध्ये या वर्षी १ हजार २६९ हजारांनी वाढ झाली आहे. आयुक्तांनी विविध विभागांसाठी दिलेल्या निधीमध्ये काटछाट करून जाहीर करण्यात आलेल्या योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.
शरद वाय-फाय योजनेअंतर्गत संपूर्ण शहरात महापालिकेच्या वतीने वाय-फायची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील ८वी ते १०वीच्या १२ हजार विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग हरित बनविणे, निर्भया सुरक्षा पथक, संतसृष्टी शिल्पाची उभारणी, मराठी भवनाची निर्मिती, क्रीडा संकुल उभारणी, सिंहगडावर तानाजी मालुसरे यांचे शिल्प, ई वेस्ट कलेक्शन सेंटर, ५ आजारांकरिता महापालिकेकडून विशेष अर्थसाह्य, पर्वती येथे पेशवाई सृष्टीची उभारणी, तळजाई येथे आॅक्सिन पार्क, तारांगण आणि मत्स्यालय, पक्षी निरीक्षण केंद्राची उभारणी आदी योजना व प्रकल्पांची घोषणा अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली आहे. १. विकलांग मुलांसाठी दरमहा
दोन हजार रुपयांचे अर्थसाह्य
२. ज्येष्ठ नागरिकांसाठी दरमहा
एक हजार अर्थसाह्य
३. विधवा, निराधार महिलांसाठी दरमहा १ हजाराचे अर्थसाह्य
४. संपूर्ण शहरात वाय-फाय सुविधा देण्यासाठी शरद वाय-फाय योजना
५. शिक्षण मंडळाच्या ८वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब
६. सीएनजीच्या १०० बसची खरेदी
७. आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग हरित बनविणार
८. निर्भया सुरक्षा पथकाची स्थापना
९. संतसृष्टी शिल्पाची उभारणी
१०. मराठी भवनाची निर्मिती
११. सिंहगडावर तानाजी मालुसरे यांचे शिल्प
१२. तळजाई येथे आॅक्सिजन पार्क, तारांगण, मत्स्यालय
१३. पाच आजारांवरील उपचारासाठी विशेष अर्थसाह्य
१४. पर्वती येथे पेशवाई सृष्टीची उभारणी
१५. पक्षी निरीक्षण केंद्राची उभारणी
१ सार्वजनिक वाहतूक सेवेचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सीएनजी युरो -४ च्या १०० बसेस खरेदी करण्याची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. महापालिकेकडून माता रमाई बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत निराधार, विधवा महिलांसाठी दरमहा १ हजार रुपये अर्थसाह्य देण्यात येणार आहे.
२ ज्येष्ठ नागरिकांना दरमहा १ हजार रुपये देण्याकरिता शरद स्वावलंबन व राजमाता जिजाऊ स्वावलंबन योजनांची घोषणा करण्यात आली. विकलांग मुलांच्या आरोग्याच्या व इतर मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी डॉ. बाबा आमटे योजनेअंतर्गत दरमहा २ हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले जाणार आहे.