२३ गावांच्या विकास आराखड्यासाठी उचलले हे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:12 AM2021-07-14T04:12:30+5:302021-07-14T04:12:30+5:30
पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, ...
पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, त्यासाठी खास सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. येत्या गुरुवारी (दि. १५) ही खास सभा दृकश्राव्य (ऑनलाईन) होणार आहे
समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यासाठी घेण्यात येणाऱ्या खास सभेसाठी उपस्थित राहण्याचा ‘व्हीप’ भारतीय जनता पक्षाच्या सर्व सभासदांना बजाविण्यात आला आहे. या गावांचा विकास जलद गतीने व्हावा, हा भाजपचा प्रयत्न असल्याचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले.
पुणे महानगपालिकेच्या हद्दीत नव्याने २३ गावांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना (एमआरटीपी) अधिनियम १९६६ च्या कलम २१ नुसार नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महानगरपालिकेने नव्याने समाविष्ट झालेल्या या २३ गावांचा प्रारूप विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्यानुसार पालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या या गावांचा विकास आराखडा पालिकेने तयार करावा, असा ठराव गेल्या आठवड्यात झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मांडून त्याला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे.
या गावांचा विकास आराखडा तयार करण्याची मंजुरी देण्यासाठी पालिकेच्या मुख्य सभेची मान्यता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या विषयावर खास सभा बोलवण्याची लेखी मागणी स्थायी समितीच्या आठ सभासदांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली होती. त्यानुसार १५ जुलैला सकाळी साडेअकरा वाजता ही खास ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आली आहे.
चौकट
“महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट २३ गावांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा. यासाठी या गावांचा विकास आराखडा तयार होणे महत्वाचे आहे. त्यामुळे ही खास सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे.”
- मुरलीधर मोहोळ, महापौर