एव्हरेस्टवर पाऊल ठेवणे हा आयुष्यातील संस्मरणीय क्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:11 AM2021-05-18T04:11:05+5:302021-05-18T04:11:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमेश जाधव पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेले अनिश्चिततेचे वातावरण, बेस कॅम्पवर तणाव असतानाही जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमेश जाधव
पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेले अनिश्चिततेचे वातावरण, बेस कॅम्पवर तणाव असतानाही जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा निश्चय केला. अन्नपूर्णा मोहिमेमुळे एव्हरेस्टवर चढाई करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला होता. प्रशिक्षण, सराव, मानसिक कणखरता, तंदुरुस्तीमुळेच एव्हरेस्टवर पाऊल ठेवण्याची स्वप्नवत कामगिरी पार पाडली असे एव्हरेस्टवीर जितेंद्र गवारे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. गवारे यांनी १२ मे रोजी सकाळी एव्हरेस्ट सर करून ऐतिहासिक कामगिरी केली होती. प्रशिक्षक, गिरिप्रेमी संस्थेचे सर्व सहकारी, ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे, एव्हरेस्टवीर भूषण हर्षे आणि डॉ. समित मांदळे, कुटुंबीय यांच्यामुळेच ही मोहीम यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले. गवारे यांच्या कामगिरीनंतर त्यांचे मूळ गाव शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे जल्लोषाचे वातावरण आहे.
एव्हरेस्ट मोहिमेवर जाण्याचा निर्णय कधी घेतला?
- एप्रिल महिन्यात गिरिप्रेमीच्या माऊंट अन्नपूर्णा मोहिमेत सहभागी झालो होतो. एव्हरेस्ट मोहिमेवर जाण्यासाठी हा योग्य हंगाम असल्यामुळे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी प्रोत्साहन दिले. शारीरिक तंदुरुस्ती चांगली असल्यामुळे ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्याचा विश्वास त्यांनी दिला. त्यामुळे एव्हरेस्ट मोहिमेवर जाण्याचा निर्णय घेतला.
मोहिमेवर जाण्यासाठी कोणती तयारी केली?
- एव्हरेस्ट मोहिमेवर जाण्यासाठी तंदुरुस्ती सर्वाधिक महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे गिर्यारोहणासाठी आवश्यक कौशल्ये उत्तमरीत्या आत्मसात केलेली असतील, तर ही मोहीम सोपी ठरू शकते. ८८४८.८६ मीटर उंच एव्हरेस्टवर गिर्यारोहण करायचे असल्याने त्यादृष्टीने आवश्यक प्रशिक्षण घेतले. आठवड्यातून दोनदा २१ किमी धावणे, आठवड्यातून दोनवेळा सिंहगडावर ट्रेकिंग, जिममध्ये दररोज तीन तास व्यायाम अशी तयारी केली. अशाप्रकारे दररोज साधारणत: आठ तास व्यायाम करावा लागत होता. या काळात शरीर थकल्यानंतर ते लवकरात लवकर पुढील चढाईसाठी सज्ज व्हावे यादृष्टीने सरावावर भर दिला. त्यामुळे मोहिमेनंतरचा रिकव्हरी काळ २८ तासांवरून १२ तासांवर आला.
एव्हरेस्ट मोहिमेची सुरुवात कशी झाली?
- अन्नपूर्णा शिखरावरील मोहीम पूर्ण केल्यानंतर, पाच ते सहा दिवस आराम केला. त्यानंतर एव्हरेस्ट कॅम्पवर आलो. मात्र, प्रत्यक्ष एव्हरेस्ट मोहीम सुरू होण्याआधी दररोज सराव, व्यायाम करावा लागतो. त्यानुसार दररोज सराव करत होता. चढाईसाठी पूरक हवामानाचा (वेदर विंडो) संदेश मिळेपर्यंत एव्हरेस्टच्या पायथ्याशी दररोज लहान-लहान मोहिमा सुरू असतात. एव्हरेस्ट मोहिमेला सुरुवात करण्याच्या एकदिवस आधी ५७०० मीटर उंचीच्या मोहिमेवर गेलो होतो. वेदर विंडो मिळाल्यानंतर सर्व थकवा सोडून मोहिमेला सुरुवात करावी लागते. त्यानुसार उमेश झिरपे यांच्याकडून वेदर विंडो मिळाल्यानंतर तातडीने मोहीम सुरू केली.
एव्हरेस्टवर चढाई करताना सर्वाधिक आव्हानात्मक टप्पा कोणता होता?
- कांचनजुंगा, अन्नपूर्णा मोहिमा केल्यामुळे एव्हरेस्ट मोहिमेवर चढाई करताना आत्मविश्वासाची कोणतीही कमी नव्हती. मात्र, एव्हरेस्टवर चढाई करताना खुंबू आईसफॉल हा आव्हानात्मक टप्पा होता. या ठिकाणी सतत मोठ्या प्रमाणात बर्फ पडत असतो. त्यामुळे हा टप्पा पार करताना कस लागतो. सुरुवातीचे हे आव्हान पार केल्यानंतर पुढे गिर्यारोहण करणे तुलनेने सोपे आहे.
कडाक्याची थंडी, वेगवान वारे यांचे आव्हान कसे पेलले?
- कडाक्याच्या थंडीचा, वेगवान वाऱ्याचा सामना करण्यासाठी उबदार कपडे, तांत्रिक साहाय्य याची माहिती अन्नपूर्णा, कांचनजुंगा या मोहिमांमध्ये मिळाली होती. त्यामुळे थंडी, वेगवान वाऱ्याचा त्रास झाला नाही.
मोहिमेत सर्वाधिक आनंदाचा क्षण कोणता?
- एव्हरेस्टसारख्या जगातील सर्वांत उंच शिखरावर पाऊल ठेवण्याचा आनंद शब्दांत सांगता येणार नाही. मात्र, त्याचवेळी एव्हरेस्ट उतरून सुरक्षितपणे कॅम्पवर परतल्यावर सहकाऱ्यांनी केलेला जल्लोष कधीही विसरता येणार नाही. एव्हरेस्टची मोहीमच अवर्णनीय, संस्मरणीय होती.
नवोदित गिर्यारोहकांना कोणता सल्ला देणार?
- मोहिमेवर जाताना त्यासाठी सर्व आवश्यक प्रशिक्षण कोर्स पूर्ण करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आहार, तंदुरुस्तीकडेही लक्ष द्यावे लागते. गिर्यारोहणामध्ये खूप अनिश्चितता असते. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक असते.
कोरोनामुळे बेस कॅम्पवर होता तणाव
कोरोनामुळे एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरही रुग्ण सापडत होते. कॅम्पवर अतिशय विचित्र वातावरण होते. प्रत्येक ठिकाणी तात्पुरत्या भिंती उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे खेळीमेळीचे वातावरण नव्हते. त्याचप्रमाणे वाय-फाय सुविधा असल्याने पुण्यातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीची माहिती मिळत होती. मात्र, या अनिश्चित, निराशाजनक वातावरणावर मात करून एव्हरेस्ट सर करण्याचा निश्चय केला आणि सहा दिवसांची ही मोहीम यशस्वी केली.
वेदर विंडो म्हणजे काय?
एव्हरेस्टवर पोहोचल्यावर वातावरण कसे असेल? याची माहिती मोहीम सुरू होण्याआधी दिली जाते. या क्षेत्रातील तज्ज्ञ यासाठी मदत करतात. एव्हरेस्टवीर गणेश मोरे, गिर्यारोहक विवेक शिवदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगोल विभागातील प्राध्यापक डॉ. अविनाश कांदेकर आणि गिरिप्रेमीचे प्रमुख उमेश झिरपे यांनी जितेंद्र गवारे यांना वेदर विंडोची माहिती दिली होती.