बुडीत बंधाऱ्याचा पथदर्शी प्रकल्प गाळात
By admin | Published: April 19, 2017 04:14 AM2017-04-19T04:14:49+5:302017-04-19T04:14:49+5:30
पाणी झपाट्याने कमी होत असल्याने धरण पाणलोट क्षेत्रातील घोड नदीवर बांधण्यात आलेले बुडीत बंधारे कोरडे ठणठणीत पडत आहेत
डिंभे : पाणी झपाट्याने कमी होत असल्याने धरण पाणलोट क्षेत्रातील घोड नदीवर बांधण्यात आलेले बुडीत बंधारे कोरडे ठणठणीत पडत आहेत. यामुळे एक वेगळेच वास्तव समोर आले आहे. या बंधाऱ्यात पाण्याऐवजी जास्त गाळच साचलेला दिसत आहे. अवघ्या काही वर्षांत ते गाळाने भरू लागल्याने महाराष्ट्रातील हा पहिलावहिलाच पायलट प्रकल्प गाळाच्या गर्तेत सापडला आहे.
आदिवासी गावांचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी काही वर्षांपूर्वी बुडीत बंधाऱ्यांची संकल्पना राबविण्यात आली. आहुपे खोऱ्यातील बोरघर, अडिवरे, कोकणेवाडी, फुलवडे येथे; तर पाटण खोऱ्यात पाटण, साकेरी, महाळुंगे व तळपेवाडी येथे सुमारे साडेअकरा कोटी रुपये खर्चून पाटबंधारे विभागाने आठ बुडीत बंधारे बांधले. यामुळे २० आदिवासी गावांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच काहीअंशी शेतीच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लावता येईल, हा यामागचा उद्देश होता. काही वर्षे या पाण्याचा या भागाला दिलासाही मिळाला.
या बंधाऱ्यांची उंची साडेपाच मीटर, पाया अडीच ते तीन मीटर, लांबी ५० मीटरपासून १०० मीटरपर्यंत अपेक्षित होती. मात्र, डिंभे धरण पाणलोट क्षेत्र हे दुर्गम डोंगरी भागात येत असल्याने हे बंधारे बांधण्यासाठी लागणारी वाळू, सिमेंट, खडी व स्टील या वस्तूंच्या वहातुकीसाठी त्या वेळी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या. प्राप्त परिस्थितीत उपलब्ध झालेल्या साधनसामग्रीवर ठेकेदारांनी या बंधाऱ्यांची कामे उरकती घेतली. यामुळे बंधाऱ्यांचा पाया कच्चा राहिला, तर काही बंधाऱ्यांचे बांधकाम अर्धवट झाले. परिणामी, आज अनेक बंधारे धरणातील पाणी कमी होऊ लागताच कोरडे ठणठणीत पडूत आहेत. सध्या तर या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने त्यांची साठवण क्षमता कमी झाली आहे.पावसाच्या पाण्याबरोबर दर वर्षी या धरणात डोंगरउतारावरून मोठ्या प्रमाणात माती वाहून येते. ही माती या बुडीत बंधाऱ्यांत साठून राहते.