काळजी घ्या! स्टेरॉईडच्या अतिसेवनाने हाडे ठिसूळ अन् अनेक आजारही वाढतील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 03:16 PM2022-05-25T15:16:19+5:302022-05-25T15:19:09+5:30
गुडघेदुखी, कंबरदुखीचे प्रमाण वाढले...
पुणे : गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेकांना आरोग्याच्या इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. कोरोनाचा तीव्र संसर्ग झालेल्या रुग्णांना स्टेरॉईडस मोठ्या प्रमाणात दिली गेली. मात्र, स्टेराॅईडसच्या वापराचे दुष्परिणाम आता दिसून येत आहेत. अशा रुग्णांमध्ये हाडे ठिसूळ होण्याची शक्यता वाढल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. त्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखीचे प्रमाण वाढले आहे.
हाडांची घनता कमी होणे ही प्रत्येक वयोगटात दिसणारी समस्या आहे. ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारामध्ये हाडे ठिसूळ होतात आणि त्यामुळे हाडांची घनता कमी होते. कोरोनाच्या संसर्गामुळे व्हायरल इन्फेक्शन आणि उपचारात वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉईडचा वापर यामुळे हाडे ठिसूळ होऊन अस्थिरोगाची समस्या उद्भवू शकते. कोरोनातून बरे झाल्यावरही रुग्णांमध्ये विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये ही समस्या दीर्घकाळ दिसून येते. म्हणून कोरोनातून बरे झाल्यानंतर हाडांची खनिज घनता (बीएमडी) चाचणी करून घेणे गरजेचे मानले जाते.
कोरोनाचा तीव्र संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचार पद्धतीमध्ये स्टेेरॉईडचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. या रुग्णांमध्ये हाडे ठिसूळ होण्याची शक्यता असते. तसेच, काही रुग्णांच्या मणक्यात संसर्ग झाल्याची उदाहरणेही आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यावर कंबरदुखी, गुडघेदुखी उद्भवली असल्यास अथवा तीव्रता वाढली असल्यास डॉक्टरांकडून योग्य निदान आणि त्यावर उपचार आवश्यक आहेत.
- डॉ. शैलेश हातगावकर, अस्थिरोग तज्ज्ञ
संसर्ग वाढल्यास तोंडावाटे अथवा इंजेक्शन मधून स्टेरॉईड दिले जाते. स्टेरॉईडच्या वापरामुळे अनेक रुग्णांचा संसर्ग आटोक्यात आणण्यास मदत झाली. मात्र अशा रुग्णांमध्ये काही कोविड पश्चात समस्या आढळून येत आहेत. यापैकी एक म्हणजे हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी रुग्णांनी उपचारांबरोबरच आहार आणि व्यायामावर भर द्यायला हवा.
- डॉ. आनंद देशमुख, अस्थिरोग तज्ज्ञ