शासकीय योजनांची काठी अद्याप दूरच

By admin | Published: January 5, 2017 03:12 AM2017-01-05T03:12:21+5:302017-01-05T03:12:21+5:30

अंध व्यक्तीला स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांच्या पुनर्वसनाकरिता शासनाने अनेक योजना आखल्या आहेत.

Stick to the Government Schemes | शासकीय योजनांची काठी अद्याप दूरच

शासकीय योजनांची काठी अद्याप दूरच

Next

पराग कुंकुलोळ, चिंचवड
अंध व्यक्तीला स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांच्या पुनर्वसनाकरिता शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. परंतु योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. अंध बांधव योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांचे जीवन अधिकच अंधकारमय बनू लागले आहे. शासनाच्या योजनांची पांढरी काठी अंधाच्या हाती कधी पडणार, असा सवाल अंध बांधव, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांकडून उपस्थित होत आहे.
शासनाच्या विविध योजनांमधून अंधांसाठी पुनर्वसनाच्या विविध योजना राबविल्या जात असल्या, तरी आवश्यक असणाऱ्या गोष्टीची पूर्तता होत नसल्याने समाजातील हा घटक त्या सुविधांपासून वंचित राहत आहे. कित्येक अंध व्यक्ती समाजातील विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्य करीत आहेत. या व्यक्ती समाजातील डोळस व्यक्ती बरोबर काम करू शकतात हे सिद्ध झाले आहे.अंधांना व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. आधुनिक व संगणकीकृत युगात आपण वावरत आहोत. अंधांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षणाची जोड देणे महत्त्वाचे असल्याचे मत प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेचे सचिव अंध शिक्षक सतीश नवले यांनी व्यक्त केले.
अंधांची शिक्षणप्रणाली व रोजगार यामध्ये मोठी तफावत आहे. ही पद्धत मध्यम कुटुंबातील मुलांना परवडणारी नाही. त्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याच्या किमती आवाक्याबाहेर आहेत. याकरिता शासनाने अंधांच्या शिक्षणासाठी साधनांची पूर्तता केली पाहिजे. त्यांना मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे.
अंध व्यक्तीला रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास कौटुंबिक समस्या सुटण्यास मदत होईल. समाजकल्याण विभागाने त्यासाठी सहकार्य करायला हवे. तरच ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल. हा व्यक्ती समाजाचा उत्पादक घटक बनू शकतो. यासाठी प्रयत्न करायला हवेत. १९८० नंतर समावेशक शिक्षण व २००३ ते ४ पासून सर्व शिक्षण अभियान या अंतर्गत सर्वसामान्यांच्या शाळेत अंधांना शिक्षणाची परवानगी दिली आहे. परंतु अंध असल्याने त्यांना सहानभूती दाखवून वा त्यांच्यावर दया करुन सवलती देण्यापेक्षा त्याला स्वावलंबी शिक्षणाचे धडे देणे महत्त्वाचे आहे.
यामुळे अंध व्यक्तीच्या गरजा व आवाहने पूर्ण होऊ शकतील. यातुन मिळणारे शिक्षण लाभदायी व रोजगारयुक्त होऊ शकते.या मुळे अशा व्यक्ती पालकांना व समाजाला
भार वाटणार नाहीत. त्यांना जखडत ठेऊन अंधत्वाचे भांडवल
करण्यापेक्षा त्यांना योग्य शिक्षण व मार्गदर्शन देणे महत्वाचे आहे. स्वयंम रोजगारातून हा घटक यशस्वी होऊ शकतो असे मत जागृती सोशल फाउंडेशनचे राम फुगे व विश्वास काशीद यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Stick to the Government Schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.