Pune: काठीने वार, पण जखमा नव्हत्या, महिलेचा खूनच; तीन वर्षांनंतर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 12:22 IST2023-12-09T12:22:02+5:302023-12-09T12:22:37+5:30
सव्वातीन वर्षांनंतर महिलेचा खून केल्या प्रकरणात पर्वती पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे....

Pune: काठीने वार, पण जखमा नव्हत्या, महिलेचा खूनच; तीन वर्षांनंतर गुन्हा दाखल
पुणे : पर्वती टेकडीवर पाण्याच्या टाकीजवळ मृतावस्थेत सापडलेल्या महिलेची ओळख पटली नाही, ना तिच्या मृत्यूचे कारण पोलिसांना समजत होते. वैद्यकीय अहवालात महिलेच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करून तिचा खून करण्यात आल्याचे समोर आले. सव्वातीन वर्षांनंतर महिलेचा खून केल्या प्रकरणात पर्वती पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती टेकडी परिसरात अर्धवट बांधकाम करण्यात आलेल्या टाकीजवळ १७ ऑगस्ट, २०२० रोजी महिलेचा मृतदेह सापडला होता. महिलेच्या शरीरावर जखमा नव्हत्या. त्यामुळे या प्रकरणी आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते, तसेच व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता. पर्वती पोलिसांना न्यायवैद्यकीय प्रयाेगशाळेकडून नुकताच अहवाल मिळाला. महिलेच्या डोक्यावर, तसेच छातीवर कठीण वस्तूने प्रहार करण्यात आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. त्यानंतर, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
महिलेची ओळख पटलेली नाही. तिच्या हातावर ‘सुरेखा’ असे नाव गोंदलेले आहे. महिलेविषयी काही माहिती असल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक विजय खोमणे यांनी केले आहे.