अद्याप ३० टक्के म्हणजे ४० कोटी जनता धोक्याच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:09 AM2021-07-30T04:09:51+5:302021-07-30T04:09:51+5:30
पुणे : सिरो सर्वेक्षणातून किती टक्के लोकांना संसर्ग होऊन गेला, हे समजते. कोरोना विषाणूचा सध्याचा प्रकार (व्हेरियंट) धोकादायक असल्याने ...
पुणे : सिरो सर्वेक्षणातून किती टक्के लोकांना संसर्ग होऊन गेला, हे समजते. कोरोना विषाणूचा सध्याचा प्रकार (व्हेरियंट) धोकादायक असल्याने किती लोकांना कोरोनाची पुन्हा लागण होऊ शकते हे सांगणे कठीण आहे. ७० टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी विकसित झाल्या असल्या तरी अद्याप ३० टक्के जनतेला म्हणजेच ४० कोटी लोकांना संसर्ग झालेला नाही. यातील ५ टक्के लोकांना तीव्र स्वरूपाची लागण झाली तरी ती संख्या १ कोटीच्या घरात जाते. एवढ्या लोकांना उपचार देऊ शकण्याइतकी आपली आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. त्यामुळे मास्कचा अनिवार्य वापर आणि दररोज १ कोटी लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे, याकडे विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड यांनी लक्ष वेधले.
हर्ड इम्युनिटी अर्थात सामूहिक प्रतिकारशक्तीचे प्रमाण आजारानुसार किंवा विषाणूनुसार बदलत असते. कोरोना विषाणूच्या बाबतीत हर्ड इम्युनिटीचे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत असणे अपेक्षित आहे. म्हणजेच दर पाच व्यक्तींमागे चार व्यक्तींच्या शरीरात त्याविरोधातील अँटीबॉडीज असाव्या लागतात. विषाणूच्या नवीन प्रकारामुळे हर्ड इम्युनिटी निष्प्रभ ठरू शकते. लसीमुळे तयार झालेल्या अँटीबॉडी निष्प्रभ करण्याची क्षमता एखाद्या स्ट्रेनमध्ये असेल, तर हर्ड इम्युनिटी प्राप्त करण्यात अडथळा येतो. मात्र, नवीन विषाणूंच्या संसर्गाच्या बाबतीत हे प्रमाण गाठणे सोपे नाही, असे जाणकारांचे मत आहे. महाराष्ट्रात सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचे प्रमाण ५९ टक्के आहे, असे आयसीएमआरने म्हटले आहे. दुसरीकडे, अमेरिकेत एकाच दिवसात डेल्टा व्हेरियंटची लागण झालेले एक लाख रुग्ण आढळल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.
-----------------
पुणे टास्क फोर्सचे अध्यक्ष डी. बी. कदम म्हणाले, ‘कोरोनाने आजवरचे सर्व अंदाज खोटे ठरवले आहेत. ८० टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी विकसित झाल्या तरच हर्ड इम्युनिटी विकसित झाली, असे म्हणता येऊ शकते. कोरोना रुग्णसंख्येचा पुण्यातील आलेख स्थिरावला आहे; खाली आलेला नाही. त्यामुळे सध्या पूर्ण लॉकडाऊन नसले तरी कोरोना प्रतिबंधक वर्तन अत्यावश्यक आहे. आयआयटी कानपूरच्या सर्वेक्षणानुसार, १५ जुलैपासून तिसऱ्या लाटेला सुरुवात होईल, असे म्हटले होते. अजून तिसरी लाट सुरू झालेली नाही. मात्र, कधी सुरू होईल हेही सांगणे अवघड आहे. त्यामुळे लसीकरणावर भर देणे आणि आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवणे यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.’
-------------------------------
पुण्यात कधी झाले सिरो सर्व्हे?
* पुण्यात आॅगस्ट २०२० मध्ये आयसीएमआर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महापालिकेतर्फे पहिले सिरो सर्वेक्षण झाले. यामध्ये ५० टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडी विकसित झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
* टोरांटो विद्यापीठाचे सेंटर फॉर ग्लोबल हेल्थ रिसर्च आणि थायरोकेअर लॅबतर्फे मे २०२१ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ६९ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी निर्माण झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.
--------------------------------
अमेरिकेत ७० टक्के लोकांचा लसीचा पहिला डोस, तर ६० टक्के लोकांचा दुसरा डोस झाला आहे. त्यानंतर अमेरिकेने सर्व निर्बंध शिथिल केले. लसीकरण झालेल्या लोकांमध्येही सौम्य स्वरुपाची लागण होऊ शकते आणि त्यांच्याकडून इतरांना संसर्ग होतो. लसीकरण न झालेल्या ३० टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरियंटची लागण झपाट्याने होत आहे. भारतातही तशी परिस्थिती उद्भवल्यास बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे लसीकरण, मास्क हेच सध्याचे उपाय आहेत.
- डॉ. अमित द्रविड, विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ