व्हीआयपी कोट्याला अजूनही प्रचंड मागणी
By admin | Published: November 15, 2015 01:13 AM2015-11-15T01:13:14+5:302015-11-15T01:13:14+5:30
रेल्वेची आॅनलाईन बुकिंग सुरू झाली़ अचानक प्रवास करायचा झाला तर तत्काळ तिकीटे आली़ याशिवाय वैयक्तिक वाहने वाढली़ विमानांचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त आणि
पुणे : रेल्वेची आॅनलाईन बुकिंग सुरू झाली़ अचानक प्रवास करायचा झाला तर तत्काळ तिकीटे आली़ याशिवाय वैयक्तिक वाहने वाढली़ विमानांचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त आणि सहज उपलब्ध झाला असला तरी रेल्वेच्या व्हीआयपी कोट्याची मागणी अजूनही तशीच असल्याचे या दिवाळीत दिसून आले़
दिवाळीच्या काळातील आरक्षण ४ महिन्यांपूर्वीच फुल्ल झाले. तत्काळमध्येही कमालीची वेटिंग. अशा परिस्थितीत प्रवासात बर्थ मिळविण्यासाठी प्रवाशांची कसरत सुरू आहे. अनेक प्रवाशांनी अखेरचा प्रयत्न म्हणून ‘व्हीआयपी सेटिंग’ करण्यावर भर दिल्यामुळे ‘डीआरएम’ कार्यालयात येणाऱ्या व्हीआयपी कोट्याच्या अर्जात दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आली. एकट्या पुणे -जम्मूतावी झेलम एक्सप्रेसला १२ जागांच्या कोट्यासाठी १०० हून अधिक अर्ज दिवाळीच्या काळात आल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली़
पुणे विभागातून दररोज साधारण ८०० जागांचा कोटा असतो़ पण सणाच्या काळात त्यात इतकी प्रचंड वाढ होती, की आमचाही नाईलाज होतो़ त्यामुळे एकाला जागा दिली की, दुसरे नाराज होतात, त्यातून अनेक जण मनात राग धरुन बसतात, असे या अधिकाऱ्याने सांगितले़
दिवाळीच्या अगोदर आपापल्या गावी जाण्यासाठी सर्वांनाच घाई होती़ अनेक प्रवासी तत्काळच्या रांगेत उभे होते.
तत्काळमध्येही वेटिंगचे तिकीट हाती पडल्यामुळे अनेक प्रवाशांची निराशा झाली. पुण्याहून दिवसाकाठी १४० हून अधिक रेल्वेगाड्या धावतात. पुणे, कोल्हापूर, मिरज येथून सुटणाऱ्या गाड्यांमधील व्हीआयपी कोट्यातून जागा मिळण्यासाठी अनेक प्रवाशांनी राजकीय नेत्यांच्या लेटरपॅडवर अर्ज करणे सुरू केले होते़ दिल्ली व उत्तरेकडे जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडयांमागे साधारणत: १५० ते १७५ अर्ज व्हीआयपी कोट्यासाठी येतात.
मात्र, त्या गाड्यांमध्ये केवळ १० ते १२ आसने उपलब्ध असतात. इतर भागांकडे जाणाऱ्या प्रत्येक गाडीसाठी ७० ते ८० अर्ज असतात. त्यामुळे व्हीआयपी कोट्यातून नेमके कुणाला रिझर्व्हेशन द्यायचे, याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची पंचाईत झाली आहे. अनेक प्रवाशांनी व्हीआयपी कोट्यातून अर्ज करूनही पुरेसा कोटा नसल्यामुळे त्यांना बर्थ मिळाला नाही.
तर काही प्रवाशांना बर्थ मिळाल्यामुळे त्यांचा प्रवासही सुखाचा झाला. अजून दोन दिवस व्हीआयपी कोट्यासाठी अशाच
मोठ्या प्रमाणात अर्ज येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.