अजूनही ‘खोडकरपणा’, सुशीलकुमार शिंदे यांची ‘साहेबांवर’ मिस्कील टिप्पणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 03:14 AM2018-02-22T03:14:23+5:302018-02-22T03:14:36+5:30
राजकारणातले एक गंभीर नेतृत्व म्हणून ‘शरदराव’ परिचित असले, तरी महाविद्यालयीन दिवसातील त्यांचा खोडकर आणि मिस्कीलपणा हा चर्चेचा विषय होता
पुणे : राजकारणातले एक गंभीर नेतृत्व म्हणून ‘शरदराव’ परिचित असले, तरी महाविद्यालयीन दिवसातील त्यांचा खोडकर आणि मिस्कीलपणा हा चर्चेचा विषय होता. त्यांच्याच वर्गातील एक मुलगा एका मुलीवर प्रेम करीत होता. तो तिला पत्र लिहायचा पण ती ते फाडून फेकून द्यायची. एकदा शरदरावांनी त्या मुलीच्या नावाने त्या मुलाला पत्र पाठविले. ‘माझं पण तुझ्यावर प्रेम आहे, पण मी मुद्दाम असे वागते. रविवारी तीनच्या शोला चित्रपटगृहात येते’, असे त्या पत्रात म्हटले होते. तो मुलगा खूश झाला. त्या चित्रपटगृहामध्ये त्याने तिची खूप वाट पाहिली, पण हळूच शरदराव
त्याच्या शेजारी जाऊन बसले...
मुलगा आला ना एवढा असे शरदरावांनी म्हटल्यावर तो मुलगा ओशाळून उठून गेला.....अजूनही शरदरावांचा ‘खोडकरपणा’ गेलेला नाही... अशा शब्दांत बीएमसीसी महाविद्यालयातील शरदरावांच्या खोडकरपणाचा किस्सा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला आणि साहेबांच्या चेहºयावरही हसू उमटले.
जागतिक मराठी अकादमीतर्फे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा सन्मानाचा प्रवास सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी बीएमसीसीच्या वास्तूतच महाविद्यालयीन शिक्षणाचे धडे गिरविलेल्या साहेबांचे मिस्कील व्यक्तिमत्त्व सुशीलकुमारांनी उलगडले... साहेबांनीदेखील इतर अनेक उद्योग करीत असल्याने महाविद्यालयीन वर्ष पूर्ण करण्यास काहीसा विलंब लागल्याची दिलखुलासपणे कबुली दिली.
या वेळी शरद पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन
सन्मानित करण्यात आले. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे, डॉ. पी. डी. पाटील, विलास रकटे, डॉ. मोहन आगाशे, संदीप वासलेकर आणि बीव्हीजीचे हणमंत गायकवाड यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, यशवंतराव गडाख, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, संयोजक सचिन ईटकर उपस्थित होते.