मुलांचे जीव धोक्यात घालून प्रशिक्षण वर्ग सुरू ; आदिवासी विभागाचा अजब कारभार चव्हाट्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 02:36 PM2020-03-28T14:36:36+5:302020-03-28T14:39:21+5:30
संपूर्ण जगासह जिल्ह्यात कोरोना विषाणूची साथ रोखण्याचे प्रयत्न चालू आहेत. महत्वाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आंबेगाव तालुक्यात गोहे येथील आश्रमशाळेत अजूनही 23 मुला-मुलीचा एका खाजगी संस्थेचा (निट)राष्ट्रिय पात्रतासह प्रवेश परिक्षा कोर्सचे प्रशिक्षण आजही सुरू असल्याचे समोर आले आहे.
सुषमा नेहरकर-शिंदे,
पुणे :या विद्यार्थ्यांना पुण्यातील काही शिक्षक शिकविण्यासाठी येतात. मुलांच्या जीव धोक्यात घालून हे प्रशिक्षण सुरू आहे.यामुळे पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने विविध योजना व प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात.याच प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून एका खाजगी संस्थे मार्फत ११वी व १२ वी च्या आदिवासी निवडक मुलांना मेडिकल इंटर्नस परीक्षा (निट) पुर्व तयारी कोर्ससाठी मेळघाट येथील व अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यातील २३ मुल, मुली ८नोव्हेंबर २०१९ ला घोडेगाव प्रकल्पा अंर्तगत गोहे शासकिय आदिवासी आश्रमशाळेत ही मुले निवासी,भोजनासह प्रशिक्षण घेत आहेत.
संपूर्ण देशात लॉकडाऊन केले असताना या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू ठेवण्याचा अटहास का धरला जातो असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनिषा वर्मा यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी सर्व खबरदारी म्हणून हे प्रशिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांना घरी सोडण्यापेक्षा त्याची जेवण खाण्याची सोय संस्थेत करण्यात येत असल्याचे त्यांनी स्षष्ट केले.
जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा, प्रकल्प बंद ठेवले असताना आदिवासी विभागाकडून केवळ या 22-23 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रशिक्षण वर्ग सुरू ठेवण्याचा काय उद्देश आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने त्वरीत योग्य ती कारवाई करण्याची मागणी आदिवासी विकास कृती समितीचे अध्यक्ष सीताराम जोशी यांनी केली आहे