जिद्दीने खेचले यश, मजुरापासून तहसीलदार होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 10:08 AM2018-06-02T10:08:44+5:302018-06-02T10:08:44+5:30
ध्येयासाठी पेटून उठलेल्या व्यक्तीला परिस्थिती कधीही हरवू शकत नाही, याचा प्रत्यय पुण्यातील सागर ढवळेकडे बघून येतो.
पुणे : ध्येयासाठी पेटून उठलेल्या व्यक्तीला परिस्थिती कधीही हरवू शकत नाही, याचा प्रत्यय पुण्यातील सागर ढवळेकडे बघून येतो. परिस्थितीअभावी महागडे क्लास तर लांबच पण मर्यादित पुस्तकांचा अभ्यास करणाऱ्या, प्रसंगी वाळू उचलणारा मजूर म्हणून काम करणाऱ्या सागरची तहसीलदार होण्याची कथा प्रेरणादायीच नाही तर स्तिमित करणारी देखील आहे.
सागरचे मूळ गाव शिरूर तालुक्यातील चिंचणी. १२वीपर्यंतचे शिक्षण गावाकडेच पूर्ण केल्यावर त्याने पुण्यातील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याचवेळी सोबतच्या मित्र मैत्रिणींसोबत राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरु केली.मात्र घरातली परिस्थिती हलाखीची असल्याने त्याला शिक्षण घेतानाही काम करणे भाग होते. लहानपणापासून कष्टाची सवय असल्याने त्याने मिळेल तिथे काम केले. अगदी विविध केटरिंगमध्ये वाढण्यापासून ते वाळूची गाडी भरण्यापर्यंत कुठलेही काम त्याला वर्ज्य नव्हते. घरी आजारी वडील आणि शेतात मजुरी करणाऱ्या आईसाठी त्याला हे काम करावे लागले. गेले दोन वर्ष त्याचे हे कष्ट सुरु आहेत. बुधवारी रात्री उशिरा लागलेल्या महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेच्या निकालाने त्याची तहसीलदार म्हणून निवड झाली.
त्याला डीवायएसपी होण्याची इच्छा होती मात्र मिळालाय त्यातही तो समाधानी आहे. तो त्याच्या आईला आयुष्याची प्रेरणा मानतो. मी तहसीलदार झालो म्हणजे नेमकं काय झालं हे तिला माहिती नसलं तरी सरकारी अधिकारी झालो हे तिच्या लक्षात आल्याचे त्याने सांगितले. मी यासाठी खूप कष्ट सोसले आहेत, अशी वेळ कोणावरच येवू नये अशी त्याची प्रांजळ इच्छा आहे. यापुढे चांगले काम करणार असल्याचा मनोदयही त्याने व्यक्त केला.