भ्रष्टाचार थांबविण्यासाठी स्टिंग
By admin | Published: April 25, 2017 03:55 AM2017-04-25T03:55:58+5:302017-04-25T03:55:58+5:30
मी निर्माता, निर्देशक आहे; हिरो नाही. माझे हिरो जिल्ह्याच्या ३६ पोलीस ठाण्यांत काम करणारे कर्मचारी आहेत. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करा
घोडेगाव : मी निर्माता, निर्देशक आहे; हिरो नाही. माझे हिरो जिल्ह्याच्या ३६ पोलीस ठाण्यांत काम करणारे कर्मचारी आहेत. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करा, असे म्हणत पोलिसांना बळ देऊ पाहणारे पुणे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी पोलिसांमधील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी स्टिंग आॅपरेशन करणार असून त्यात दोषी आढळणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचा थेट इशारा जिल्ह्यातील पोलिसांना दिला आहे.
पुणे ग्रामीणमधील पत्रकारांकडून सूचना, अभिप्राय व त्यांची पोलिसांविषयीची मते जाणून घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक राम शिंदे हेदेखील उपस्थित होते. त्यांनी जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील प्रमुख वार्ताहरांकडून परिस्थिती जाणून घेतली. या वेळी अनेक पत्रकारांनी पोलिसांच्या तक्रारी मांडल्या. एवढ्या तक्रारी ऐकून पोलीस अधीक्षकदेखील अचंबित झाले. या सर्व तक्रारी सोडविण्यासाठी पुढील चार महिने मला पुरणार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या वेळी सुवेझ हक यांनी सांगितले, की पोलिसांमधील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी स्टिंग आॅपरेशन सुरू केली आहेत. काही दिवसांपूर्वी इंदापूरजवळ चेक पोस्टवर काही पोलीस कर्मचारी रात्रीच्या वेळी हप्ते वसूल करतात, अशी तक्रार आली. यावर रात्री आम्ही आमचे कर्मचारी पाठवून स्टिंग आॅपरेशन केले. त्यात तो कर्मचारी दोषी आढळला. त्याला लगेच निलंबित केले. अशा प्रकारचे स्टिंग आॅपरेशन येथून पुढे सतत केले जाणार व त्यात दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार. पोलिसांनी चांगले काम केले, तर निश्चित त्याचे कौतुक होईल व जर वाईट केले काम केले, तर त्यावर कारवाई केली जाईल.
तसेच, पुणे ग्रामीणमधील पोलीस ठाण्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून लोकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी काम करणार आहे. यासाठी पुणे ग्रामीणच्या ३६ पोलीस ठाण्यांमध्ये काम करणाऱ्या तीन हजार लोकांमध्ये मला बदल करायचा आहे, हे माझ्यापुढे मोठे आव्हान असल्याचे मला वाटते.
गावागावांत सीसीटीव्ही बसल्यामुळे गुन्हेगारी मोडून निघण्यासाठी मोठी मदत होईल.
(वार्ताहर)