शेतकऱ्याचे आजच्या बाजारभावानुसार ४० हजार रुपयांचे २० क्रेट टोमॅटो चोरीला; शिरूरमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 04:47 PM2023-07-20T16:47:44+5:302023-07-20T16:48:04+5:30

शेतकऱ्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोठे भांडवल उभे करून टोमॅटो पिकाची लागवड केली होती

Stolen 20 crates of tomatoes worth 40 thousand rupees according to today's market price of the farmer; Type in Shirur | शेतकऱ्याचे आजच्या बाजारभावानुसार ४० हजार रुपयांचे २० क्रेट टोमॅटो चोरीला; शिरूरमधील प्रकार

शेतकऱ्याचे आजच्या बाजारभावानुसार ४० हजार रुपयांचे २० क्रेट टोमॅटो चोरीला; शिरूरमधील प्रकार

googlenewsNext

शिरूर (पुणे) : सध्या टोमॅटो बाजारभावाने मोठा उच्चांक गाठला असल्याने शेतकऱ्याच्या या पिकाला सोन्याचा भाव मिळत आहे. जिल्हयातील बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या माध्यमातून लाखोंच्या घरात उत्पन्न मिळवले आहे. तर काही कोट्याधीश झाले आहे. बाजारात टोमॅटो महाग झाले असले तरी बळीराजा मात्र सुखावल्याचे चित्र दिसू लागले आहे. अशातच शिरूरच्या पिंपरखेड गावात खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शेतकरी अरुण बाळू ढोमे यांनी शेतातून तोडून निवड करून ठेवलेले सुमारे वीस क्रेट टोमॅटो क्रेटसह चोरून नेल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. चोरीच्या या घटनेबाबत टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

आजच्या बाजारभावानुसार ढोमे यांचे अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला गेले असल्याचे ढोमे यांनी सांगितले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोठे भांडवल उभे करून ढोमे यांनी टोमॅटो पिकाची लागवड केली होती. सध्या टोमॅटो पिकाची तोडणी करून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांनी योग्य निवड करून टोमॅटो क्रेट आपल्या वाहनातून घराजवळ आणून उभे केले होते. सांयकाळी अकरा वाजेच्या सुमारास ढोमे हे गाडी व क्रेट व्यवस्थितरित्या लावल्याची खात्री करून झोपले. मात्र सकाळी उठल्यानंतर गाडीत टोमॅटो भरलेले क्रेट नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने टोमॅटोची क्रेटसह चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप बोंबे यांना घटनेची माहिती देत टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र येथे फिर्याद दाखल केली असून या घटनेचा तपास लावण्याची मागणी केली आहे.

बेट भागातील जांबूत, पिंपरखेड, चांडोह, फाकटे, शरदवाडी आदि परिसरातून  शेतकऱ्यांशी निगडीत कृषीपंप, ठिबकसंच, केबलचोरी, कृषीयंत्र चोरी अशा स्वरूपाच्या अनेक चोरीच्या घटना घडलेल्या आहे. यामध्ये बहुतेक चोऱ्यांचा तपास न लागता दिवसेंदिवस या घटनांचे प्रमाण वाढले असल्याने सदर चोरीतील गुन्हेगारांचा छडा लावण्याची  मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Stolen 20 crates of tomatoes worth 40 thousand rupees according to today's market price of the farmer; Type in Shirur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.