हाय-फाय लाईफस्टाईलसाठी चोरल्या ४५ दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 02:21 AM2018-09-15T02:21:01+5:302018-09-15T02:21:27+5:30

१२ दुचाकी हस्तगत; कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा प्रताप; कोकणात जाऊन विकायचा गाड्या

Stolen for High-Fi Lifestyle 45 Bike | हाय-फाय लाईफस्टाईलसाठी चोरल्या ४५ दुचाकी

हाय-फाय लाईफस्टाईलसाठी चोरल्या ४५ दुचाकी

Next

पुणे : हाय-फाय लाईफस्टाईल जगण्यासाठी कृषी महाविद्यालयात शेवटच्या (चौथ्या) वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने शहरातून तब्बल ४५ दुचाकी चोरल्या आहेत. यातील साडेपाच लाख रुपये किमतीच्या बारा दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
अमरनाथ ज्ञानदेव घुलेश्वर (वय २१, रा. मु. पो. खळी, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे अटक आरोपीचे नाव आहे. घुलेश्वर याला स्टायलिश राहण्याची सवय लागली होती. मात्र त्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने तो दुचाकी चोरत व त्या विकत. संघटित गुन्हेगारी पथकातील हवालदार संतोष क्षीरसागर यांना खबऱ्याकडून अमरनाथ घुलेश्वर शहरातील विविध परिसरांतून वाहने चोरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कोंढवा, हडपसर, कात्रज, देहू रस्ता, तसेच सायन (मुंबई), पनवेल, ठाणे या परिसरातून वाहनचोरीचे ४५ पेक्षा जास्त गुन्हे केल्याची कबुली दिली. तो चोरीची वाहने बायरोडने चिपळूण, रत्नागिरी येथे घेऊन जात होता. त्या ठिकाणी तो वाहनांची विक्री करीत होता. ग्राहकाने कागदपत्रांची मागणी केल्यास कागदपत्रे हरवली आहेत किंवा आणून देतो असे सांगत होता. त्याच्याकडून कोंढवा पोलीस ठाण्यातील एक, स्वारगेट पोलीस ठाण्यातील एक, देहूरोड पोलीस ठाण्यातील एक, पनवेल शहर व नवी मुंबई पोलीस ठाण्यातील चार, पाटण पोलीस ठाण्यातील दोन, वागळे इस्टेट पोलीस ठाण्यातील (ठाणे) दोन व सायन पोलीस ठाण्यातील एक असे बारा गुन्हे उघडकीस आले आहेत. वाहनांचे पेट्रोल संपल्यावर काही वाहने त्याने रस्त्यातही सोडलेली आहेत. तर वाहन चोरताना सीसीटीव्ही फुटेज आल्याचे समजताच ते वाहनही तो सोडून देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, गुंडा स्कॉडचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, उत्तम बुदगुडे व पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर, सर्फराज शेख, प्रशांत पवार, शकील शेख, सुनील चिखले, नीलेश शिवतरे, रमेश चौधर, विजय गुरव, राकेश खुणवे, किरण ठवरे, प्रवीण पडवळ, कैलास साळुके, संभाजी गंगावणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील संजय दीक्षित
यांनी पोलीस कोठडीची
मागणी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मतकर यांनी आरोपीस १५ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

अ‍ॅप्लिकेशनवरून घेत वाहनाची माहिती
घुलेश्वर वाहनांच्या बनावट चावीने चोरी करीत. त्याच्याजवळ आठ बनावट चाव्या मिळून आल्या आहेत. तो दुचाकी चोरल्यानंतर मोबाइलमधील वाहन इन्फो अ‍ॅपवर गाडीचा नंबर टाकत असे. तेथून वाहनाचे मॅन्युफॅक्चरिंग वर्ष व इतर माहिती काढून घेत होता.

ओएलएक्सवर विक्रीसाठी असलेल्या वाहनाचा क्रमांक तो चोरलेल्या गाडीवर टाकून तिची
विक्री करीत होता. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता.

Web Title: Stolen for High-Fi Lifestyle 45 Bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.