चोरीला गेलेला फोन चक्क कुरिअरने मिळाला परत; मोबाइल शोधण्यासाठी पोलिसांची अभिनव शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 07:01 PM2023-01-25T19:01:28+5:302023-01-25T19:04:23+5:30
मोबाइल फोन चक्क कुरिअरने परत मिळाला...
बारामती (पुणे) : हरविलेल्या, चोरीला गेलेल्या मोबाइलचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी नामी शक्कल लढविली आहे. त्यातून एका बारामतीकर नागरिकाचा गहाळ झालेला ४५ हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन चक्क कुरिअरने परत पाठविण्यात आला आहे.
लोकांचे हे हरवलेले, चोरी गेलेले मोबाइल शोधून देण्याबाबत पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी अग्रक्रम दिला आहे. त्यानुसार सायबर सेलची मदत घेऊन ते मोबाइल चालु असणाऱ्या ठिकाणची माहिती सर्व पोलिस ठाण्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत कळवली जाते. मात्र, मोबाइल परराज्यात मिळून आल्यास प्रवास लांबचा असल्याने त्या ठिकाणी पोलिस पोहोचत नाहीत. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी काहीच तपास न करण्यापेक्षा सदरचा मोबाइल ज्यांच्या ताब्यात आहे. त्यांना सरळ फोन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मोबाइल जवळ असणारे संबंधित कदाचित चोर नसतील, त्यांना कोणीतरी तो मोबाइल दिला असेल. त्यांना त्यांच्याकडे असणाऱ्या मोबाइल याबाबत पुणे ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दाखल असल्याचे सांगितल्यास कदाचित ते लोक सदरचा मोबाइल परत पाठवून देऊ शकतात, अशा सूचनेचा यामध्ये समावेश आहे.
याचप्रकारे बारामती येथील न्यायालयात काम करणारे आकाश संजय खंदारे यांचा मोबाइल १४ नोव्हेंबर २०२२ रोजी गहाळ झाला होता. हा मोबाइल तामिळनाडूमध्ये ‘ॲक्टिव्हेट’ झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर येथील पोलिसांनी गोयल यांच्या सूचनेनुसार तामिळनाडूच्या त्या मोबाइलधारकाला फोन केला. त्याला या मोबाइलबाबत तक्रार बारामती शहर पोलिस स्टेशनला असल्याचे सांगितले. तसेच तो मोबाइल तत्काळ पाठवून द्यावा, अन्यथा आपल्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यावर पोलिस कारवाईच्या भीतीने तामिळनाडूच्या इसमाने तो फोन दुसरा कोणाकडून तरी विकत घेतलेला होता. त्याने सरळ कुरिअरमध्ये जाऊन तो मोबाइल बारामती शहर पोलिस ठाण्याच्या पत्त्यावर पाठवून दिला. बुधवारी (दि. २५) पोलिस अधीक्षक गोयल यांच्या आदेशान्वये पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी हो मोबाइल तक्रारदाराला परत दिला. सायबर पोलिस ठाणे, बारामती शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, दशरथ इंगवले यांनी कारवाईत सहभाग घेतला.