‘स्मशानातल्या सोन्या’वर ते भरताहेत पोटाची खळगी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 11:52 PM2017-11-19T23:52:21+5:302017-11-19T23:52:37+5:30

पुणे : चाळणी हातामध्ये घेऊन दशक्रिया घाटांवरील नदीपात्रातील वाळू चाळून पोटाची खळगी भरणा-या कष्टक-यांच्या पदरी आजही उपेक्षितांचे जगणे वाढून ठेवलेले आहे

The 'stomach of gold' filled with stomach | ‘स्मशानातल्या सोन्या’वर ते भरताहेत पोटाची खळगी

‘स्मशानातल्या सोन्या’वर ते भरताहेत पोटाची खळगी

Next

लक्ष्मण मोरे
पुणे : चाळणी हातामध्ये घेऊन दशक्रिया घाटांवरील नदीपात्रातील वाळू चाळून पोटाची खळगी भरणा-या कष्टक-यांच्या पदरी आजही उपेक्षितांचे जगणे वाढून ठेवलेले आहे. दशक्रिया चित्रपटाच्यानिमित्ताने एकूणच मर्तकाच्या विधींवर गुजराण करण्याच्या व्यवसायाची चर्चा सुरू झाली असून घाटांवर ‘स्मशानातलं सोनं’ शोधण्याचा प्रयत्न करणाºया चित्रपटातल्या ‘भान्या’प्रमाणे पुण्यात आजही शेकडो तरुण एकवेळच्या भाकरीसाठी दिवसदिवसभर मुठा नावाच्या गटारगंगेमध्ये चाळण घेऊन उभे असतात. त्यांच्या नशिबी आजही अवहेलना, दु:ख आणि बहिष्कृतता याशिवाय दुसरे काहीही नाही.
‘आई-वडील माझ्या लहानपणीच वारले, मला दोन मुली आहेत. माझ्या भावाचा आणि भावजयीचाही मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या दोन मुलांचा मीच सांभाळ करतो. ओंकारेश्वराजवळच्या एका झोपड्यात राहतो आणि दिवसभर वैकुंठ स्मशानभूमीतून गटारात टाकलेली राख चाळत बसतो. पोटाची भूक भागवण्यासाठी हे काम करावे लागते. या पाण्यामुळे अंगाला खाज सुटते. अनेकदा जखमा होतात. उपचारांसाठीही पैसे नसतात. एकवेळची भाकर कशी मिळेल, या विचारातच माझा दिवस गटार आणि राख यांच्या सोबतीमध्ये जातो.’ मिलिंद सिद्धाप्पा वसकुटे आपल्या जगण्यातील व्यथा सांगत होता.
मिलिंद कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील बंचनमटी गावचा आहे. त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले असून पत्नी आणि दोन मुलांसह तो ओंकारेश्वर मंदिराजवळील झोपडीमध्ये राहतो. त्याचे आई-वडीलही मृतदेहांची राख चाळून उदरनिर्वाह करायचे.
गरिबीमुळे शिक्षण न घेता आल्याने अशिक्षित राहिलेला मिलिंद
मागील दोन वर्षांपासून हे काम करू लागला आहे. त्याच्या भाऊ आणि वहिनीचेही निधन झाल्याने त्यांच्या दोन मुलांची जबाबदारीही त्याच्यावरच आहे.
अण्णाभाऊ साठेंच्या ‘स्मशानातलं सोनं’ या कथेची आठवण व्हावी, असं या कष्टक-यांच जीणं आहे. कष्टकºयांच्या जगण्यातील संघर्षाचे अशा स्वरुपाचे चित्रण अनेक कथांमधून मांडण्यात आलेले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दशक्रिया चित्रपटाच्या माध्यमातून धर्मक्षेत्रे-तीर्थक्षेत्रे बनून राहिलेल्या गावांमधील वर्गांची उतरंड आणि अर्थार्जनाचे अघोषित दंडक, त्यातून निर्माण होत चाललेला व्यवस्थेबद्दलचा राग यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. मात्र, पुरोगामित्वाचा वारसा असलेल्या पुणे शहरामध्येही काही वेगळी परिस्थिती नाही. आजही शहरामधील घाटांवरच्या गटारसदृश पाण्यामध्ये उतरून सोने शोधून दोन पैसे कमाविण्याचे समाजाच्या दृष्टीने अत्यंत हीन दर्जाचे समजले जाणारे हे काम करण्याची वेळ अनेकांवर ओढवलेली आहे.
शिक्षण नाही, रोजगार नाही, कमालीचे दारिद्र्य, जगण्याची वणवण, अंधश्रद्धा यामधून या शोषितांच्या वाट्याला मृतदेहाच्या राखेमध्ये भाकर शोधण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. दुर्लक्षित आणि उपेक्षित असलेल्या या घटकाच्या जगण्याला अर्थ आहे, असे म्हणण्यासारखी स्थिती नाही.
घाटांवर दशक्रिया आणि पिंडदान पार पडल्यावर उरलेले पिंड, नैवेद्य, अन्य साहित्य नदीपात्रामध्ये टाकून देण्यासाठी या तरुणांना बोलावले जाते. दशक्रियेसाठी आलेले सुसंस्कृत, सुशिक्षित आणि जाणते लोक नदीकाठावर नाकाला रुमाल लावून उभे राहतात. त्यांना पाण्यामध्ये उतरण्याचे धाडस होत नाही. अशा वेळी ही मुलंच त्यांच्या मदतीसाठी पुढे येतात. मोबदल्याची अपेक्षा न करता ही मुलं पाण्यामध्ये पिंड आणि रक्षा विसर्जित करून देतात. नदीपात्रातील रस्त्यावरून जाताना जेथे नाकाला रुमाल लावण्याशिवाय पर्याय नसतो, अशा दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाण्यात ही मुलं दिवसभर वाळू काढून ती चाळत असतात. दिवसभराच्या कष्टांनंतरही हाती काही लागेलच, याची शाश्वती नसते. अनेकदा रिकाम्या हाताने परत जावे लागते. काही मिळालेच तर सोनार भाव कमी करून त्यांच्या हातामध्ये अवघे काही रुपयेच टेकवतात. हलाखीचे जीणे, आर्थिक-सामाजिक मागासलेपण यामुळे कष्टकºयांची ही कुटुंबे आणखीच गर्तेत जाऊ लागली आहेत. त्यांच्या उत्थानासाठी रोजगार आणि शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
>वैकुंठ स्मशानभूमीमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर रक्षा सावडली जाते. नातेवाईक सावडलेली रक्षा आणि अस्थी घेऊन गेल्यानंतर गाळे स्वच्छ केले जातात. गाळ्यांमधील मृतदेहाची राख आणि उरलेल्या अस्थी स्मशानभूमीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या नाल्यांमध्ये टाकून दिल्या जातात. त्याच ठिकाणी चार-पाच महिला आणि काही तरुण दिवसभर हातामध्ये घमेली आणि चाळण्या घेऊन ही राख नाल्याच्या पाण्यामधून काढून चाळत असतात. त्यांच्या राखेत मृतदेहाच्या हाडांचे अवशेषही येतात. हातानेच या अस्थी बाजूला करून राखेत सोनं शोधण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू राहतो. येथे काम करीत असलेल्या महिलांनी मात्र स्वत:ची ओळख सांगण्यास नकार दिला. आम्ही हे काम करतो हे जर समजले तर समाजात कुठेच सन्मानाने फिरता येणार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
>काय करतात नेमके काम? : वैकुंठ स्मशानभूमीच्या पाठीमागील नदीपात्रामध्ये मृतदेहांची राख टाकण्यात येते. मृतदेहाच्या तोंडामध्ये ठेवलेला सोन्याचा मणी अथवा वितळलेल्या सोन्याचे अवशेष मिळावेत, याकरिता राख आणि वाळू चाळली जाते. डेक्कन, ओंकारेश्वर घाट, संगम पूल, अहिल्यादेवी घाट या घाटांवर दशक्रिया विधी केले जातात. या ठिकाणांवरही महिला आणि तरुण, तसेच लहान मुले वाळू चाळण्याचे काम करतात. यादरम्यान मिळालेले कपडे, भांडी, नारळ आदी साहित्य पाण्यामधून काढून घेतले जाते. सोन्याचे कण एकत्र करून त्याची सोनाराकडे विक्री केली जाते. त्यामधून मिळणाºया तोकड्या उत्पन्नावर गुजराण केली जाते.
शिवाजीनगर येथील जुना तोफखाना (राजीव गांधीनगर) वसाहतीमध्ये राहणाºया सुनील श्रावण दुनघव (वय २६) या तरुणाला अगदी लहानपणातच या कामाला जुंपून घ्यावे लागले.
मागील चौदा वर्षांपासून तो हे काम करीत आहे. ओंकारेश्वर घाटाजवळच्या नदीपात्रात
त्याचे काम सुरू असते. त्याला दोन मुली आहेत.
वडिलांचे निधन झालेले असून आई, दोन भाऊ आणि एका बहिणीचे लग्न करायचे असल्याने नाईलाजास्तव तो हे काम करतो.रुक्मिणी राम दिवटे ही ५५ वर्षांची महिला रामटेकडी झोपडपट्टीमधून ओंकारेश्वर घाटावर येते.
मागील चाळीस वर्षांपासून नदीपात्रातील घाटावरची वाळू चाळून हाती जे लागेल त्यावर कुटुंबाची गुजराण केली जाते.
पन्नास वर्षांपूर्वी करमाळा तालुक्यातील मोरवड गावामधून जगण्यासाठी पुण्यात आलेल्या रुक्मिणी यांच्या पतीचे निधन झाले आहे. तीन मुलांचा संसारगाडा त्या ओढत आहेत.

Web Title: The 'stomach of gold' filled with stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे