दगडी चौथऱ्याची तोडफोड
By admin | Published: April 4, 2016 01:23 AM2016-04-04T01:23:14+5:302016-04-04T01:23:14+5:30
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या पुरातन गडकोटातील मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडील बाजूस असलेल्या दगडी चौथऱ्यावर मेघडंबरी उभारून तेथे
जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या पुरातन गडकोटातील मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडील बाजूस असलेल्या दगडी चौथऱ्यावर मेघडंबरी उभारून तेथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारण्यासाठी चौथऱ्याची तोडफोड सुरू असून, चौथऱ्याच्या दगडाच्या पहिल्याच थराखाली चुनखडी-विटांमध्ये त्याकाळात तयार केलेली पाण्याची टाकी खुली झाली असून, त्यामध्ये पाणी आढळून आले, त्याचबरोबर दगडी मूर्ती व चुनखडीतून तयार केलेली शिवपिंड सापडली आहे.
गेल्या चार-पाच वर्षांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या राजमाता अहिल्यादेवींचा पुतळा गडकोटांमधील याच दगडी चौथऱ्यावर उभारण्याचे काम सध्याच्या विश्वस्त मंडळींनी हाती घेतले. त्यासाठी या चौथऱ्याची तोडफोड करण्यात येत होती. पहिलाच थर उखडल्यानंतर असा प्रकार निदर्शनास आल्याने सदर काम थांबविण्यात आले आहे.
यामुळे नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू झाली असून, गडकोटांच्या व जेजुरीनगरीच्या विकासाच्या शिल्पकार अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा गडकोट आवारात उभारला जाणे, ही बाब स्वागतार्ह असली, तरी त्यासाठी भक्कम दगडी चौथऱ्याची तोडफोड करणे योग्य आहे काय? आढळून आलेली मूर्ती, शिवपिंड आणि पाण्याची टाकी याचे नेमके महत्त्व काय असावे? व ते याच ठिकाणी ठेवण्यामागचा उद्धेश काय असावा? याला काहीतरी धार्मिक आधार असावा, अशीच चर्चा सर्वत्र आहे.
या संदर्भात अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्यासाठी अत्यंत आग्रही असणारे देव संस्थानचे विश्वस्त
संदीप घोणे यांच्याशी संपर्क
साधला असता त्यांनी, या ठिकाणी पाण्याची टाकी होती. ती उघडी असल्याने यात्रा व गर्दीच्या
काळात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पंधरा-वीस वर्षांपूर्वी
तत्कालीन विश्वस्त मंडळाने
तिच्यावर फरशी बसवून ती बंदिस्त केली होती. यामुळे येथे काही
चुकीचे झालेले आहे असे आजिबात नाही. मात्र, याबाबतची संपूर्ण माहिती घेतली जाईल.
ब्रांझ धातूपासून तयार केलेली अहिल्यादेवींची मूर्ती या ठिकाणी बसवण्याचा आम्ही सर्व विश्वस्त मंडळाने निर्णय घेतला होता.
यापूर्वीच्या कोणत्यानी विश्वस्त मंडळाने गडकोटात तोडफोडीचा निर्णय घेतलेला नव्हता, उलट दुरुस्त्याच केलेल्या आहेत. या विश्वस्त मंडळाने मात्र पूर्ण माहिती न घेता ऐतिहासिक वास्तूची
रचनाच बदलण्याचा घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचीच चर्चा अधिक आहे.