‘त्या’ गुळाचे वाटप थांबवा
By admin | Published: June 17, 2016 05:06 AM2016-06-17T05:06:15+5:302016-06-17T05:07:57+5:30
जोपर्र्यंत चौकशी समितीचा अहवाल येत नाही, तोपर्र्यंत त्या गुळाचे अंगणवाडीतील बालकांना वाटप करू नये, असे आदेश गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
पुणे : जोपर्र्यंत चौकशी समितीचा अहवाल येत नाही, तोपर्र्यंत त्या गुळाचे अंगणवाडीतील बालकांना वाटप करू नये, असे आदेश गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
जिल्ह्यातील तब्बल साडेचार हजारपेक्षा अधिक अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांना पोषण आहारामध्ये गूळ पावडरचे वाटप करण्यात येते. चक्क हातभट्टीसाठी वापरण्यात येणाऱ्या गुळाचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक बाब जिल्हा परिषद सदस्य दशरथ काळभोर यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत निदर्र्शनास आणून दिली होती.
या वेळी गूळ खाल्ल्यावर एका पदाधिकाऱ्याला करंट लागला.... महिला सदस्यांना तरतरी आली.... तर एका सदस्याने डोक्यात झटका बसल्याच्या प्रतिक्रिया सभेतच सदस्यांनी दिल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी वाटप करण्यात आलेल्या गुळाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजीव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती नेमण्यात आली आहे. यात एक अन्न व औषध प्रशासन अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी व उरुळी कांचनच्या सुपरवायझर यांचा समावेश आहे.
हा गूळ दोन महिन्यांपूर्वी एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी वाटप करण्यात आला होता. मेनंतर मुलांना सुट्टी असल्याने पुढील वाटप झाले नव्हते. आता स्थायी समितीत सदस्यांनी हा गूळ निकृष्ट असल्याचा आरोप केल्याने चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येईपर्यंत हा गूळ अंगणवाडीतील मुलांना वाटप करू नये, असे आदेश दौलत देसाई यांनी आज महिला व बालकल्याण विभागाला दिले आहेत.
महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता, गुळाच्या पावडरचे दोन महिन्यांपूर्वी वाटप करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश आम्ही पुढे दिले आहेत, असे सांगितले. (प्रतिनिधी)
सर्वसाधारण सभा गाजणार
येत्या शनिवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होत असून, या गूळ प्रकरणामुळे गाजण्याची शक्यता आहे. तसेच निवडणुका जवळ आल्याने विरोधक आक्रमक होत असल्याने येत्या सभेत अनेक प्रकरणे बाहेर काढणार असल्याचे काही जणांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आम्ही केलेल्या मागणीनुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली असून, वाटप थांबविले आहे. याचे स्वागत करतो. मात्र, वाटप थांबविण्यापेक्षा अंगणवाडीत गेलेला माल तेथून उचलून परत मागवायला हवा.
- दशरथ काळभोर,
जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना