सामान्यांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या भाजपाला वेळीच रोखा
By admin | Published: February 16, 2017 03:25 AM2017-02-16T03:25:24+5:302017-02-16T03:25:24+5:30
काळा पैसा भारतात आणून तो सर्वसामान्य जनतेच्या बँक खात्यात जमा केला जाईल, अशी खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या
हडपसर : काळा पैसा भारतात आणून तो सर्वसामान्य जनतेच्या बँक खात्यात जमा केला जाईल, अशी खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने नोटाबंदी करून सर्वसामान्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. त्यांना शहराच्या विकासाचे काही देणे-घेणे नाही , त्यामुळे या भाजपा सरकारला वेळीच रोखा व शहरातील विकास असाच अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला पुन्हा कारभार करण्याची संधी द्या, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ हडपसर येथील जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी आमदार जयदेव गायकवाड, जालिंंदर कामठे, जगन्नाथ शेवाळे, अंकुश काकडे, रूपाली चाकणकर, कैलासमामा कोद्रे, प्रशांत तुपे, नीलेश मगर, मंगेश तुपे, यांच्यासह प्रभाग क्रमांक २२ मुंढवा -मगरपट्टा प्रभागातील राष्ट्रवादीचे उमेदवार नगरसेवक चेतन तुपे, नगरसेविका चंचला कोद्रे, नगरसेवक बंडू गायकवाड, हेमलता नीलेश मगर, हडपसर गावठाण-सातववाडी प्रभाग क्रमांक २३ मधील नगरसेविका वैशाली बनकर, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, विजय मोरे, योगेश ससाणे, रामटेकडी-सय्यदनगर २४ प्रभागातील उमेदवार आनंद आलकुंटे, प्रभाग क्रमांक २५ वानवडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार महापौर प्रशांत जगताप, माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, कांचन जाधव, दिलीप जांभुळकर, तसेच प्रभाग क्रमांक २६ महंमदवाडी-कौसर बागमधील उमेदवार नगरसेवक फारूक इनामदार, नगरसेविका नंदा लोणकर, संजय घुले, अस्मिता साळवे आदीजण व्यासपीठावर उपस्थित होते.
पवार म्हणाले केंद्र आणि राज्यातील या भाजपा सरकारने भावनिक घोषणा करून सत्ता मिळविली. त्यातील किती घोषणांची पूर्तता झाली, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. काळा पैसा शोधण्याच्या नादात नोटाबंदी केली. मात्र, त्यातून काळा पैसा सापडला तर नाहीच, उलट सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. दिवस उलटले, तरी व्यवहारात सुरळीतपणा आला नाही. पर्यायाने अनेक कंपन्यांनी कामगार कपात करत बेरोजगारांची संख्या वाढविली. सर्वसामान्यांचे रोजचे जीवनच उद्ध्वस्त केले. यांना आता वेळीच आवर घाला. पुणे शहर तसेच हडपसर बदलतंय, हे खरं आहे. राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार हे पुण्याचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. आपल्या भगिनी पुढे येतात, या भगिनींनी राजकारणात आदर्श निर्माण केला आहे. पालिकेत ५० टक्क्यांपेक्षा महिला आज चांगले नेतृत्त्व करतात. महिलांना संधी दिल्यानंतर कसे चांगले काम करतात, हे राष्ट्रवादीच्या सर्वच महिला नगरसेविकांनी विकासकामे करून सिद्ध केले आहे. शहर बदलतंय माहिती तंत्रज्ञान आणि जगातील व्यवसाय व शिक्षणासाठी पुणे हे अग्रेसर आहे. भाजपा असा इतरांपेक्षा वेगळा पक्ष आहे असे सांगितले जाते, त्या-त्या भागात असलेल्या गुन्हेगारांना पाठीशी घातले जात आहे. चुकीची
कामे करणाऱ्या लोकांना उमेदवारी दिली जात आहे. हे भाजपाचे दुर्दैव आहे. (वार्ताहर)