महापालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे घेतल्यास टँकरला पाणी देणे बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 11:54 AM2019-04-26T11:54:12+5:302019-04-26T12:08:02+5:30
उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे शहरात सर्वच भागातून टँकरला प्रचंड मागणी वाढली आहे.
पुणे : महापालिकेकडून येत्या दोन दिवसांत महापालिका, ठेकेदार आणि खाजगी टँकरचे दर निश्चित करण्यात येणार आहेत. त्यानंतर पाण्याच्या टँकरसाठी महापालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे घेतल्यास संबंधित टँकरला पाणी देणे बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे. तसेच शहरातील सर्व टँकर पॉईटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून, शंभर टक्के टँकर जीपीएस यंत्रणेसोबत जोडण्यात आले आहेत. तसेच या जीपीएस सिस्टिमचा कंट्रोल प्रथमच महापालिका करणार आहे.
उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे शहरात सर्वच भागातून टँकरला प्रचंड मागणी वाढली आहे. पुणेकराकडून पाण्याच्या मागणीमध्ये सरासरी १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यात सध्या महापालिकेकडून कवेळ एकवेळच आणि अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येतो. यामुळे अनेक मोठ्या सोसायट्यामध्ये पहिल्या मजल्यावर देखील पाणी चढत नाही. यामुळेच सध्या उपनगराबरोबरच मध्यवस्तीसह सर्वच भागातून टँकरच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. परंतु नागरिकांच्या गैरसोयीचा फायदा घेत टँकर माफीयांकडून पुणेकरांची लुट सुरु केली आहे. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी पाणी पुरवठा अधिका-यांची बैठक घेऊन तातडीने विविध उपाय-योजना करण्याचे आदेश दिले.
याबाबत पाणी पुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी सांगितले की, सध्या शहरामध्ये दररोज सरासरी ४०० ते ४५० टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शहराच्या विविध ७ ठिकाणी महापालिकेच्या वतीने टँकर भरणा केंद्र (पॉईट) निश्चित करण्यात आले आहेत. या सर्व टँकर पॉईटवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. तर महापालिका, ठेकेदार आणि खाजगी टँकरला देखील जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे. टँकरला लावण्यात आलेल्या जीपीएस सिस्टीमचे कंट्रोल रुम प्रथमच महापालिकेच्या सावरकर भवन येथे सुरु करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेच्या टँकर पॉईटवर दररोज किती टँकर भरले जातात, भरलेला टँकर कुठे जातात यावर थेट नियंत्रण ठेवले जाणार आहे.
--------------------------
एका टँकरसाठी १३०० ते १५०० दर निश्चित करणार
सध्या महापालिकेकडून पाण्याच्या एका टँकरसाठी ५२२ रुपये घेतले जातात. यामध्ये वाहतुकीचा दर सुमारे ९०० रुपये गृहीत धरण्यात आला आहे. त्यामुळे टँकर चालकांनी नागरिकांना १३०० ते १५०० रुपयांपर्यंत टँकर देणे आवश्यक आहे. परंतु टँकर माफियांकडून नागरिकांची लुट सुरु असून, तब्ब्ल २२०० ते २५०० रुपयांपर्यंत दर आकारले जात आहे. यामुळे येत्या दोन दिवसांत महापालिकेकडून टँकरचे दर निश्चित करण्यात येणार आहेत. यापेक्षा अधिक दर घेतल्यास संबंधित टँकर मालकावर ककड कारवाई करून पाणी देणे बंद करण्यात येणार आहे.
- प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, पाणी पुरवठा विभाग