Pune: टेकडीफोड बंद करा, अनधिकृत बांधकामे थांबवा; खासदार वंदना चव्हाणांची मागणी

By राजू हिंगे | Published: October 4, 2023 04:19 PM2023-10-04T16:19:28+5:302023-10-04T16:19:49+5:30

वारंवार मागणी करूनही प्रशासन यावर काहीच निर्णय घ्यायला तयार नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली...

Stop hill demolition, stop unauthorized constructions; MP Vandana Chavan's demand | Pune: टेकडीफोड बंद करा, अनधिकृत बांधकामे थांबवा; खासदार वंदना चव्हाणांची मागणी

Pune: टेकडीफोड बंद करा, अनधिकृत बांधकामे थांबवा; खासदार वंदना चव्हाणांची मागणी

googlenewsNext

पुणे : जैवविविधता उद्यान म्हणून आरक्षित केलेल्या टेकड्या फोडल्या जात आहेत. तुम्हाला त्या वाचवायच्या आहेत की नाही? असा संतप्त प्रश्न करत या टेकड्यांचा विकास आराखडा तयार करा अशी मागणी राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. वारंवार मागणी करूनही प्रशासन यावर काहीच निर्णय घ्यायला तयार नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

शहराच्या विकास आराखड्यात आसपासच्या अनेक टेकड्या बीडीपी ( बायो डायव्हर्सिटी पार्क) म्हणून आरक्षित केल्या आहेत. या टेकड्यांचे संरक्षण करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. प्रत्यक्षात या टेकड्यांवर फार मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यासाठी टेकड्या फोडल्या जात आहेत असे खासदार चव्हाण यांचे म्हणणे आहे. त्यासाठीचे अनेक पुरावे त्यांनी याआधीही महापालिका प्रशासनाला दिले आहेत, तसेच टेकड्या वाचवण्याची मागणी केली आहे. मात्र त्यासाठी महापालिका काहीही हालचाल करायला तयार नाहीत. त्यामुळे खासदार चव्हाण यांनी बुधवारी आयुक्तंची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.

सरकारनेही याकडे दुर्लक्षच केले आहे. आरक्षणात काहीजणांच्या खासगी जागा आहेत. सरकारने त्यांना या जागांचा किती मोबदला द्यायचा याचा त्वरीत निर्णय घेणे गरजेचे आहे. या टेकड्या शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक आहे, त्या सपाट झाल्या तर संपूर्ण शहरच रूक्ष व कोरडे होऊन जाईल असे त्या म्हणाल्या. महापालिकेने आरक्षित टेकड्यांभोवती संरक्षक कुंपण तयार करावे, तिथे झालेल्या अनधिकृत बांधकामांवर, ते करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, टेकड्यांचा विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा, संपूर्ण बीडीपी क्षेत्राचे खासगी व सरकारी असे वर्गीकरण करावे, आरक्षित जमिनींची विक्री थांबवण्यासाठी त्यांच्या सात-बाराच्या उताऱ्यावर बीडीपी आरक्षणाची नोंद करावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी यावर त्वरीत कारवाई करण्याचे आश्वासन खासदार चव्हाण यांना दिले. चव्हाण यांनी सांगितले कीशहराची झपाट्याने होत असलेली वाढ,  भरघोस एफएसआयच्या वाटपाचा निर्णय (ज्याला आमचा विरोधही आहे). हवामान बदलाचे गंभीर परिणाम - ढगफुटी, पूर येणे, उष्णतेच्या लाटा, हवेची खालावत जाणारी गुणवत्ता, रोगराई, भूगर्भातील पाणी कमी होणे अशा गोष्टी लक्षात घेता शहराच्या हिरव्या फुफ्फुसांचे संरक्षण करणे अत्यंत अत्यावश्यक आहे. चव्हाण यांच्यासमवेत यावेळी माजी उद्यान अधीक्षक यशवंत खैरे, वास्तूविशारद अनित बेनेंजर, अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम, नितीन जाधव हेही उपस्थित होते.

Web Title: Stop hill demolition, stop unauthorized constructions; MP Vandana Chavan's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.